साताऱ्यातील ‘हॅकर’ करतोय नुसतीच बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:09+5:302021-07-09T04:25:09+5:30

सातारा : सोशल मीडियाचे जितके चांगले फायदे आहेत, तितके तोटेही आता समोर येऊ लागलेत. हॅकरच्या माध्यमातून बँकेच्या खात्यातील पैसे ...

The 'hacker' in Satara is just slandering | साताऱ्यातील ‘हॅकर’ करतोय नुसतीच बदनामी

साताऱ्यातील ‘हॅकर’ करतोय नुसतीच बदनामी

Next

सातारा : सोशल मीडियाचे जितके चांगले फायदे आहेत, तितके तोटेही आता समोर येऊ लागलेत. हॅकरच्या माध्यमातून बँकेच्या खात्यातील पैसे गायब होण्याच्या घटना यापूर्वी साताऱ्यात घडल्या होत्या. आता मात्र हॅकर पैशाच्या मागे न लागता अनेकांची सोशल मीडियावर नुसतीच बदनामी करू लागलाय. परंतु या पाठीमागचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

सोशल मीडियावर फेसबुक असो, इन्स्ट्राग्राम असो की ट्वीटर असो यातील कोणतेही अकाऊंट हाताळताना खरं तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, शिवाय आपले अकाऊंट हाताळल्यानंतर ते लाॅगआउट करायला विसरू नका, असा सल्ला सायबरतज्ज्ञ वारंवार देत आहेत. कारण साताऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून हॅकरने भल्याभल्यांची पाचावर धारण बसविलीय. कधी कोणाचे अकाऊंट हॅक होईल, याची शाश्वती नाही. दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले. या अकाऊंटवरून त्या जवानाच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज येऊ लागले. त्यानंतर त्याने गावी असलेल्या आपल्या भावाला याची कल्पना दिली. त्यानंतर त्याच्या भावाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन ‘हॅकर’च्या त्रासाचा पाढाच वाचला. संबंधित हॅकर सध्या तरी बदनामीच्या इराद्याने मेसेज पाठवत आहे. मात्र, नंतर त्याच्याकडून पैशाची मागणीही होऊ शकते. त्याचे कारण म्हणजे एखाद्याच्या खासगी अकाऊंटमधील चॅटिंग हॅकरजवळ असणार. त्याचा गैरवापर करत हॅकर इथून पुढे पैसेही मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हॅकरचा शोध घेणे गरजेचे आहे.

अशाच प्रकारची घटना आठ महिन्यांपूर्वी साताऱ्यात घडली होती. हॅकरने एका महाविद्यालयीन युवतीचे फेसबुक अकाऊंट हॅक केले. त्यानंतर त्या मुलीच्या अकाऊंटला अश्लील मेसेज आणि काही फोटोही त्याने अपलोड केले. हा प्रकार संबंधित मुलीच्या निदर्शनास आल्यानंतर त्या मुलीने तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणाचे पुढे काय झाले, हे अद्याप कोणालाच समजले नाही. केवळ तक्रार दाखल करून घेऊन काहीच उपयोग होत नाही. या प्रकरणाच्या मुळाशी पोलिसांनी जाणे गरजेचे आहे. या दोन घटनांची उदाहरणे प्रातिनिधिक स्वरूपात इथे देण्यात आलीत. मात्र, अशा प्रकारच्या बऱ्याच घटना सध्या साताऱ्यात घडत आहेत. तक्रारदारांनीही बदनामीची भीती न बाळगता थेट पोलीस ठाण्यात धाव घ्यावी, तरच भविष्यातील बदनामीचे षडयंत्र थांबेल.

चाैकट : म्हणे हॅकर तुमच्याच ओळखीचा !

आपली सोशल मीडियावर बदनामी होतेय, असं जर आपण तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलो तर सुरुवातीला पोलीस तक्रारदारालाच प्रश्नांची सरबत्ती करून अक्षरश: भंडावून सोडतात. जसं की तक्रारदारच आरोपी आहे. असं काही वेळ त्यालाच वाटतं. एवढ्यावरच न थांबता हॅकर तुमच्या ओळखीचा असावा, असंही पोलिसांकडून सांगितलं जातं. पण यात कितपत तथ्य आहे हे जोपर्यंत हॅकर सापडत नाही तोपर्यंत वस्तुस्थिती समोर येत नाही.

कोट :

केवळ त्रास देण्याच्या उद्देशानेच हॅकरचे उपद्व्याप सुरू आहेत. आमच्याकडे एक तक्रार आली आहे. मोबाइलचा डेटा जप्त केला असून, हे प्रकरण सायबर सेलकडे पाठविण्यात आले आहे. लवकरच हॅकरपर्यंत सायबर सेल पोहोचेल.

सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका.

Web Title: The 'hacker' in Satara is just slandering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.