मोळ परिसराला गारांनी झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:48 AM2021-02-20T05:48:19+5:302021-02-20T05:48:19+5:30
पुसेगाव : दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रीय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे गुरुवारी दुपारी चारच्या ...
पुसेगाव : दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रीय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ गावात गारांचा सुमारे दोन तास पाऊस झाला. शेतीशिवार, अंगणात सर्वत्र गारांचा खच पडला होता. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
शेतात ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके उभी आहेत. काही ठिकाणी त्यांची काढणी सुरू आहे. कांदा पिकाची काटणी सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मोळ भागात विजेच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी हैराण झाला. रब्बी हंगाम हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. घातलेले भांडवलही काही शेतकऱ्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकावर होत्या. मात्र गुरुवारी झालेल्या पावसाच्या पाण्याबरोबर त्या वाहून गेल्या. ज्वारी, गव्हासारखी पिके सध्या काढण्याच्या अवस्थेत आली आहेत. काहीजणांची पिके काढून ठेवली आहेत. कांदा पिकाला चांगला दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी आठ-दहा दिवस अगोदरच कांद्याच्या काढणीला सुरुवात केली आहे. गुरुवारच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले.
घरातील लोकांचा वर्षभराचा खाण्याचा, सालभराचा पसा-कुडताही पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून कमालीची चिंता व्यक्त होत आहे. दिवाळीपासून सुरू असलेल्या वीट व्यवसायालाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. वीट उत्पादनासाठी लागणारे बगॅस, राख, चुरी, कोळसा, माती यांच्या किमतीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. तसेच नांदेड, लातूर, बीड आदी ठिकाणांहून आणलेल्या वीट कामगारांना दिलेल्या मोठ्या रकमेच्या उचली यांमुळे आधीच वीट उत्पादक मालक अडचणीत आले होते.
त्यातच या अवकाळी पावसाचा फटका फडातील उभ्या विटांना बसला आहे. गारांच्या पावसाने या थापलेल्या विटांचा अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे मोठी भांडवल गुंतवणूक करून वीट उत्पादकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.
चौकट :
तातडीने पंचनामे करावेत
मोळ भागात गुरुवारी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीट उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत, अशी मागणी मोळचे सरपंच वैभव आवळे यांनी केली आहे.
खटाव तालुक्यातील मोळ गावात गुरुवारी दुपारी चार वाजता तब्बल दोन तास गारांचा मोठा पाऊस झाला. शेतीशिवार तसेच अंगणांत गारांचा खच पडला होता. (छाया : केशव जाधव)