‘भूमी अभिलेख’मध्ये हेलपाटे
By Admin | Published: February 11, 2015 09:28 PM2015-02-11T21:28:09+5:302015-02-12T00:37:56+5:30
मोजणीची कामे ठप्प : काम बंद आंदोलनामुळे लोकांची गैरसोय
पाटण : विविध कामांसाठी लागणारे शेत जमिनी व गावठाणांचे नकाशे तसेच जमीन मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज, न्यायालयाच्या आदेशानुसार करावयाची मोजणी अशा सर्व कामांसाठी पाटण तालुक्यातील जनता गेल्या महिनाभर पाटण येथील भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक कार्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे कार्यालयास टाळे असल्यामुळे कामकाज ठप्प असल्याचा परिणाम जाणवत आहे.
तालुक्यातील तारळे, कोयना, ढेबेवाडी, चाफळ, मल्हारपेठ, मारुल हवेली, मोरगिरी विभागातील लोक पाटण शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात कामानिमित्त येत असतात. बऱ्याच लोकांना या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन आहे. हे माहिती नाही. त्यामुळे सोमवारी असंख्य लोक भूमी अभिलेख कार्यालयाच्या बंद दरवाजापर्यंत येऊन कामाविना माघारी गेले.
अगोदरच मोजणीची कामे प्रलंबित असल्यामुळे लोकांना जमिनीची मोजणी मागवून सुध्दा सहा महिने, वर्षभर वाट पाहावी लागत असल्याचा अनुभव आहे. त्यातच आता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे गैरसोयीत भर पडली आहे. (प्रतिनिधी)
फलकच करतोय स्वागत...
मोजणीसंदर्भात सोमवारी भूमी अभिलेख कार्यालयात तारळे भागातून आलो तर तिथे कार्यालयातील काम बंद असल्याचा फलक पाहावयास मिळाला. शासनाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवाव्यात आणि भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज पूर्ववत करावे.
- अनिल जाधव, तारळे, ता. पाटण