rain in satara: खटावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस, शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:33 PM2022-04-08T16:33:19+5:302022-04-08T16:49:31+5:30
कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघालेल्या तसेच या लाटेने हैराण झालेल्या जनतेला शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला. मात्र पावसामुळे गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
खटाव : मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. ४० अंशांच्या वर पारा जात आहे. कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघालेल्या तसेच या लाटेने हैराण झालेल्या जनतेला आज, शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला. मात्र पावसामुळे गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
खटावमध्ये कडाक्याचे ऊन असतानाच अचानक ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली, तर नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाळी थंड वातावरणामुळे नागरिकांना उष्णतेतून दिलासा मिळाला.
सध्या शेतात उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. एकीकडे कांद्याचे दर उतरले आहेत. याची चिंता शेतकऱ्याला लागली असतानाच कांदा काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र पुरती तारांबळ उडाली आहे. वादळामुळे खटावमध्ये विद्युत पुरवठा बंद झाला.