corona virus Satara- पळशीत वाड्या-वस्त्यांवर घरच्या घरीच केशकर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:48 PM2021-05-12T16:48:46+5:302021-05-12T16:49:45+5:30
corona virus satara : माण तालुक्यातील पळशी व परिसरातील वाड्यावस्त्यांवर कोरोना झपाट्याने पसरत असून, रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ घरातच राहून काळजी घेत आहेत. लॉकडाऊनमुळे सलून दुकाने बंद असल्याने आता ग्रामस्थांनी घरातील सदस्यांच्या मदतीने केश कर्तन घरच्या घरीच सुरू केले आहे.
पळशी : माण तालुक्यातील पळशी व परिसरातील वाड्यावस्त्यांवर कोरोना झपाट्याने पसरत असून, रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ घरातच राहून काळजी घेत आहेत. लॉकडाऊनमुळे सलून दुकाने बंद असल्याने आता ग्रामस्थांनी घरातील सदस्यांच्या मदतीने केश कर्तन घरच्या घरीच सुरू केले आहे.
कोरोनाचा ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर शिरकाव झाला असून, माळीखोरा येथे सध्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती बाधित आढळल्याने त्यांना विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या आठवड्यात माळीखोरा येथे एकाच कुटुंबात तीन बाधित आढळले. पुन्हा त्याच कुटुंबात आणखी दोघे जण बाधित आढळल्याने ग्रामस्थांत अस्वस्थता पसरली आहे.
येथील लोकसंख्या जवळपास दीड ते दोन हजार इतकी आहे. येथील ग्रामस्थ आपली व कुटुंबीयांची काळजी घेत असून, घराबाहेरही येणे टाळत आहेत त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास एक प्रकारे मोलाची मदत होत आहे. स्वयंस्फूर्तीने परिसर आठ दिवसांपासून बंद करण्यात आला असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्वोपरी प्रयत्न करीत आहे.
असेल ते खाऊ.. पण नियम पाळू!
किराणा मालासाठी वस्त्यांवरील लोकांना गावात जावे लागत असले तरी सध्या गावात जाणे सर्वांनीच टाळले असल्याचे दिसत आहे. असेल ते खाऊ.. पण, नियम पाळू! असा निश्चय सर्वांनीच केल्याचे दिसत आहे.
वेळ निभावून जात आहे...
लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंदची परिस्थिती असून केश कर्तनाची दुकाने बंद आहेत. त्यामुळे यूट्युबवर पाहून अनेक जण वेडेवाकडे का होईना पण घराच्या घरीच घरातील सदस्यांच्या मदतीने मुलांचे केश कर्तन करीत आहेत. अर्थात कारागिरांची सर येत नसली तरी वेळ निभावून जात आहे.