'साताऱ्यातील हज यात्री सौदीला रवाना
By admin | Published: September 3, 2016 11:28 PM2016-09-03T23:28:56+5:302016-09-04T00:35:02+5:30
ज्येष्ठांना प्राधान्य : ४५ दिवसांची होणार हज यात्रा, अनेकांनी दिल्या शुभेच्छा
सातारा : सातारा जिल्ह्यातील जवळपास ११५ हजयात्री हे शुक्रवारी दुपारी २.५० वाजता मुंबईहून हजयात्रेसाठी सौदीला विमानाने रवाना झाले आहेत. याठिकाणी एकूण ४५ दिवसांची हजयात्रा ते करणार असून, हजला जाण्याच्या पूर्व संध्येला अनेक मान्यवरांसह नागरिकांनी या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.
मुस्लीम समाजात नमाज पठण करणे, उपवास ठेवणे धार्मिक कर देण्याबरोबरच आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्यांना आयुष्यात एकदा तरी हज करणे आवश्यक आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक लोक हजयात्रेसाठी जात असतात. यंदा सातारा जिल्ह्यातून हज कमिटीने ७५ नागरिक तर खासगी टूरने ४० नागरिक हजला गेले आहेत. यापैकी सातारा शहरातून १० नागरिकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली आहे.
दरवर्षी भारतातून जवळपास १ लाख २० हजार नागरिक हजला जातात. त्यापैकी महाराष्ट्रातून ७ हजार तर सातारा जिल्ह्यातून १२० ते १३० जणांना हज यात्रेला जाण्याचा योग येतो, अशी माहिती हाजी इकबाल बागवान यांनी दिली.
‘जिलहज’ या मुस्लीम महिन्यात ही हजयात्रा सुरू होते. यात्रेकरू या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सौदी येथील ‘मक्का’ येथे पोहोचतात. याठिकाणी सर्वप्रथम एहराम बांधणे, तवाफ करणे, सफा व मरवाहमध्ये सई (चालणे) करणे, आब-ए-जमजमचे पाणी पिणे, हजसाठी कुर्बानी करणे, सैतानाला दगड मारणे, मदिना मशीदमध्ये नमाज पठण करणे आदी विधी याठिकाणी पूर्ण झाल्यावरच हज पूर्ण होतो.
साताऱ्यातील हजयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना यंदा याठिकाणी ४५ दिवस राहण्याचा योग आला आहे. शुक्रवारी विमानाने जाण्यासाठी यात्रेकरू गुरुवारी रात्रीच मुंबई विमानतळावर रवाना झाले होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. सदर बझार येथील अल्लाउद्दीन जमादार हेही हजयात्रेसाठी रवाना झाले असून, त्यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगरसेवक संदीप साखरे, नगरसेविका मुमताज चौधरी, राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, सादिक बेपारी, भारत माता मंडळाचे कार्यकर्ते तसेच चेतन सोलंखी, वसीम सय्यद, गणेश भोसले, रियाज संदे यांनी शुभेच्छा दिल्या व हजयात्रेत मनोकामना पूर्ण व्हावी, अशा सदिच्छा दिल्या.
सदर बझार येथून शहरातील हज यात्रे जाणाऱ्या यात्रेकरूंना रुमाल, टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी इतर नागरिकांनीही श्रीफळ देऊन त्यांना निरोप दिला. (प्रतिनिधी)
पासपोर्टसाठी पुणे
सातारा जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत आहे. सुरुवातीला आॅनलाईन अर्ज भरून त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुणे पासपोर्ट कार्यालयाला जाऊन यावे लागते. त्यानंतर पात्रताधारकांची संपूर्ण चौकशी होऊन पुन्हा एकदा पुणे कार्यालयात जाऊन आपले पासपोर्ट निश्चीत करावा लागतो. साताऱ्यातील पासपोर्टधारकांना याचा त्रास होत असून, साधारण एक महिन्यात येणारे पासपोर्ट कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी बराच कालावधी लागतो व अनेकवेळा पुण्याला हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे साताऱ्यात पासपोर्ट आॅफिस काढावे, अशी मागणी होत आहे.
तीन-चार वर्षांनी येतो नंबर
महाराष्ट्रातून हजारो हज यात्रेकरी हज कमिटीच्या माध्यमातून हज यात्रा पूर्ण करतात. यासाठी अर्ज भरल्यानंतर किमान तीन-चार वर्षांनी नंबर येतो. तर ७० वर्षांपेक्षा अधिक वयोवृद्ध ज्येष्ठांना अर्ज केलेल्या पहिल्याच वर्षी हज कमिटी यात्रेसाठी संधी देतात. त्यामुळे हज कमिटीचा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.