हळदी-कुंकवाला जाणेही असुरक्षित!
By admin | Published: September 21, 2015 10:35 PM2015-09-21T22:35:48+5:302015-09-22T00:13:00+5:30
गंठण हिसकावले : शाहूपुुरीतील महालक्ष्मी कॉलनी रस्त्यावरील घटना
सातारा : गौरीपूजनानिमित्त घरोघरी आयोजित केल्या जाणाऱ्या हळदी-कुंकवाला जाणेही महिलांसाठी सुरक्षित राहिले नसल्याचा अनुभव शाहूपुरीतील सुवासिनीला सोमवारी आला. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने या महिलेच्या साठ हजारांच्या गंठणावर हात मारला.ऋता सचिन देशमाने (वय २८, रा. पेंडसेनगर, लोकमंगल हायस्कूलच्या शेजारी, शाहूपुरी) यांनी या घटनेबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी गौरीपूजन असल्यामुळे घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. देशमाने या आपल्या सासूच्या घरी हळदी-कुंकवाला गेल्या होत्या. तेथून परतताना अज्ञात दुचाकीस्वार त्यांच्या मागून येऊन पुढे गेला. नंतर त्याने दुचाकी वळविली आणि देशमाने यांच्या समोर आला. क्षणार्धात त्याने देशमाने यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले आणि वेगात पोबारा केला. हे गंठण तीन तोळ्यांचे असून, त्याची किंमत सुमारे साठ हजार रुपये आहे. शाहूपुरीतील छाबडा हायस्कूलच्या मागील बाजूस ध्रुव गणेश मंदिर आहे. या मंदिराजवळ महालक्ष्मी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, उपनिरीक्षक पी. डी. देवकाते पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
दोन साखळीचोरांना अटक
वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. गणेश भगवान गायकवाड (वय २०, रा. रामकुंड, सदर बझार), सईद बासू शेख (वय २५, रा. नगरपालिका चाळ, सदर बझार) अशी त्यांची नावे आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्तींनी मोटारसायकलवरून येऊन एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन वाट्या आणि मणी असलेले मंगळसूत्र हिसकावून नेले होते. हा प्रकार बढिये पेट्रोल पंप ते अजिंक्य बझार या रस्त्यावर घडला होता. या रस्त्यावर जबरी चोरीच्या घटना ज्यांच्या बाबतीत घडल्या असतील, त्यांनी स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.