सातारा शहराला वळवाने झोडपले! अर्धा तास बॅटिंग; वीजपुरवठा खंडित, रस्त्यावरून पाण्याचे लोट, बाजारकरूची धावपळ
By नितीन काळेल | Published: May 7, 2023 05:49 PM2023-05-07T17:49:14+5:302023-05-07T17:51:00+5:30
पाऊस सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सातारा : सातारा शहर आणि परिसराला रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. ढगांच्या गडगडाटात जवळपास अर्धा तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. पाऊस सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सातारा शहरात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली गेली. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झाली होती. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार व्हायचे. तसेच पाऊसही पडत गेला. तीन आठवड्यांपूर्वी काही दिवस पाऊस झाला. यामुळे शहराचा पारा कमी झाला होता. मात्र, मागील पाच दिवसापासून कमाल तापमान पुन्हा वाढू लागलेले. त्याचबरोबर उन्हाच्या झला चांगल्या जाणवत होत्या. उकाडाही वाढला होता. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. रविवारी सकाळी तर प्रचंड उकाडा जाणवत होता. वारे शांत होते. यामुळे पाऊस होणार असे चित्र निर्माण झालेले. दुपारी एकनंतर तर ढगाळ वातावरण तयार झाले.
सातारा शहर आणि परिसरात दुपारी दोनच्या सुमारास अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस लवकरच पडणार असा अंदाज होता. दुपारी तीनच्या सुमारास सातारा शहर आणि परिसरात आभाळ भरून आले. त्याचबरोबर ढगाचा गडगडाट सुरू झाला. पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले. त्यानंतर बघता बघता पावसाने जोर धरला. सुमारे अर्धा तास पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली. छोट्या विक्रेत्यांचेही नुकसान झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.