अर्धवट जळालेल्या ‘त्या’ युवकाचा खून प्रेम प्रकरणातून !
By admin | Published: January 16, 2016 11:58 PM2016-01-16T23:58:00+5:302016-01-17T00:32:41+5:30
पोलिसांचा तपास : पिंपोडे खुर्दच्या घटनेने ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का...’ची आठवण
वाठार स्टेशन : ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का, यार नेही लूट लिया घर यारका...’ या हिंदी गाण्याला साजेसा प्रकार कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्दच्या माळरानावर ६ मे २०१५ रोजी घडला होता. मित्राच्या प्रेयसीला आपलंसं करण्यासाठी मित्रालाच संपविण्याचा डाव यशस्वी झाला; परंतु पुणे पोलिसांच्या कारवाईत या गुन्ह्याला अखेर वाचा फुटली आणि शांत डोक्याच्या एका गुन्हेगाराचे कृत्य उघड झाले.
यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी की, पिंपोडे खुर्द येथील माळातील ओघळीत ६ मे २०१५ रोजी एका अनोळखी युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. याबाबत वाठार पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला. मात्र, या गुन्ह्यातील हा युवक कोण, याची गुढता अनेक महिने राहिली.
अखेर पुणे पोलिसांच्या तपासात एका जबरी चोरीतील सराईत गुन्हेगार ललीत दीपक खुल्लम (वय २९) याने सातारा जिल्ह्यातील वाठार पोलीस ठाणे हद्दीत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील एका युवकास पेटवून देऊन खून केल्याचे स्पष्ट केले. यावरून वाठार पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास गतिमान करत सिन्नरच्या या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला.
ललीत खुल्लम हा मूळ गहुंजे (पुणे) येथे राहत होता. नोकरीच्या शोधात तो २४ मार्चला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे पत्नी अनितासह वास्तव्यास होता. या दरम्यान त्याची मैत्री पवन मेढे (वय २७, रा. सिन्नर) या युवकाशी झाली. त्यावेळी पवनने त्याचे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे ललीतला सांगितले. ललीतनेही या दोघांनाही आपल्याच घरात राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ललीतच्या दुमजली घरात हे दोघे मित्र राहू लागले.
ललीत हा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची नजर पवनच्या प्रेयसीवर पडली. आणि काहीही करून तिला आपलंसं करण्याचा त्याने निर्णय घेतला. त्याला या घरातच चांगली संधीही चालून आली. ललीत हा बऱ्याच वेळा घरीच असायचा. तर मित्र पवन हा व्यवसायाने चालक असल्याने सतत घराबाहेर असायचा.
पत्नी अनिता ही नोकरीनिमित्त बाहेर जात होती. त्यामुळे ललीत आणि पवनची प्रेयसी यांना घरात एकांत मिळत होता. मात्र, ललीतला पवनचा अडसर होत होता. त्यामुळे ललीत पवनला घेऊन बाहेर जायचा. त्याला दारू पाजून त्याचे मोबाइलवर फोटो काढायचा. आणि पवनचे फोटो दाखवून प्रेयसीला बदनाम करायचा. यातून पवन आणि प्रेयसी यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्यात तो यशस्वी झाला; परंतु पवनला कायमचं संपवून त्याच्या प्रेयसीशी लग्न करण्याचा चंग त्याने बांधला होता. त्याप्रमाणे कट रचून त्याने २ मे २०१५ रोजी सिन्नरमधील चोरीची गाडी घेतली आणि बाहेरच्या बाहेर पवनला या गाडीत घेऊन पुण्यात त्याच्या आईला भेटला. त्यानंतर त्याच रात्री सातारा जिल्ह्णातील देऊर-आसनगाव शिवारातील मित्र महेश बाबर याच्याकडे जाण्याचा बेत आखला. मात्र, महेश बाबर न भेटल्याने त्याने अंबवडे चौकातील एका बिअर शॉपीतून मद्य घेतली.
अंबवडे चौक ते वाघोली दरम्यानच्या निर्जन माळरानात पवनला भरपूर दारू पाजली. आणि याच ठिकाणी असलेल्या ओघळीजवळ त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून त्याचा गळा चिरला. त्याला संपविण्यासाठी आणलेले पाच लिटर पेट्रोल त्याच्या शरीरावर ओतून त्या ओघळीत त्याला पेटवून दिले. त्यानंतर सिन्नरकडे पलायन केले. त्यानंतर सिन्नरमध्ये पत्नी अनिता आणि पवन याच्या प्रेयसीकडे ‘पवन कोठे आहे?’ असे विचारत बनाव केला.
ललीतने पवनला संपविलं असले तरी आता पत्नी अनिताचीही त्याला अडचण वाटत होती. अखेर तिलाही त्याने घराबाबेर काढले आणि तो मित्राच्या प्रेयसीला घेऊन पंचवटी (नाशिक) येथे राहू लागला.
‘पवन नोकरीसाठी नेपाळला गेला आहे. तो आता परत येणार नाही,’ असं मित्राच्या प्रेयसीला सांगून ‘तुला आता कोणीच स्वीकारणार नाही आणि मीही पत्नीला सोडले आहे. त्यामुळे आपण लग्न करू,’ असे सांगत तिला आपलंसं केलं. मात्र, पुण्याच्या पोलीस तपासात ललीत हा अट्टल गुन्हेगार असल्याने त्याला बोलतं केलं आणि या गुन्हा ललीत खुल्लम यानेच केल्याचे स्पष्ट झालं, अशी माहिती पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली. (वार्ताहर)
ललीतवर अनेक गंभीर गुन्हे
ललीत खुल्लम हा थंड डोक्याचा गुन्हेगार आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर जबरी चोरीचे पंधरा, खुनाचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ललीतने या विविध गुन्ह्यांसाठी सत्तरहून अधिक मोबाईल सीमकार्ड तर वीसहून अधिक मोबाईल संच वापरले आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.