पिंपरीतील दीडशेजणांना गॅस्ट्रोसदृश साथ
By admin | Published: May 2, 2017 11:49 PM2017-05-02T23:49:58+5:302017-05-02T23:49:58+5:30
पिंपरीतील दीडशेजणांना गॅस्ट्रोसदृश साथ
रहिमतपूर : ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने गॅस्ट्रोने कोरेगाव तालुक्यातील पिंपरीत थैमान घातले आहे. १५० पेक्षा जास्त ग्रामस्थ जुलाब व उलटीने त्रस्त आहेत. गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या त्रासाने अनेकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पिंपरी येथील ग्रामदेवतेची २९ व ३० एप्रिलला यात्रा पार पडली. यात्रेपूर्वी वाठार किरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणी तपासणी करणाऱ्या पथकाने दि. २७ रोजी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीतील पाण्यात टीसीएल पावडरचे प्रमाण कमी आहे, पाणी पिण्यास वापरू नये, अशी सूचना लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीला केली होती. दरम्यान, सरपंच नारायण पवार यांनी विहिरीतील पाण्यात टीसीएल पावडर प्रमाणात टाकण्याची सूचना ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिली होती, परंतु संबंधित कर्मचाऱ्याने टीसीएल पावडर विहिरीतील पाण्यात न मिसळल्याने गॅस्ट्रोची साथ उद्भवल्याची शक्यता ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.
अनेक नागरिकांना जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी वाठार किरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गर्दी केली. रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पवार यांनी वाठार आरोग्य केंद्रातील कर्मचारी पिंपरी येथील उपकेंद्रात पाठवून गावातच उपचार करण्यास सुरुवात केली. जुलाब, उलटी या त्रासामुळे अशक्तपणा आलेल्या रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करून तत्काळ सलाईनद्वारे उपचार केले जात आहेत. लहान मुलेही जुलाब, उलटीने त्रस्त आहेत.
काही रुग्ण रहिमतपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव पाटील यांनी पिंपरी येथील उपकेंद्रास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यात्रेला आलेले अनेक पै-पाहुणे गॅस्ट्रोच्या साथीत सापडले आहेत.
रुग्णांसाठी बाळसिद्ध हायस्कूल रिकामे
पिंपरी येथील उपकेंद्रात रुग्णांना दाखल करून उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना दाखल करण्यासाठी बाळसिद्ध हायस्कूल रिकामे करून त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था केली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, कोरेगाव गटविकास अधिकारी, आदींनी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच डॉ. दिलीप माने यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हास्तरावरून तत्काळ अॅम्ब्युलन्ससह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.