आधे इधर, आधे उधर... बाकी किधर?
By admin | Published: July 18, 2016 11:15 PM2016-07-18T23:15:14+5:302016-07-19T00:21:57+5:30
सातारा वाहतूक शाखेची फाळणी : ‘सांगा क्रेन कोणाची?’ प्रश्नाचं उत्तर मिळेना; दोन ठाण्यांच्या वादात गाडी पडली कोनाड्यात!
सातारा : जिल्ह्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा शहरातील वाहतूक शाखेची फाळणी करून शाहूपुरी अन् शहर पोलिस ठाण्यात कर्मचारी वर्ग करण्याचा फतवा निघाला खरा; मात्र ‘रोजची कमाई’ करून देणाऱ्या दोन ‘क्रेन’ कोणाच्या ताब्यात राहणार, या मुद्द्यावरून भलतेच त्रांगडे निर्माण झाले आहे. या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने सोमवारी मोटारसायकली ओढून आणणारी क्रेन दिवसभर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरच पडून होती. त्यामुळे ‘आधे इधर, आधे उधर... बाकी किधर?’ असा प्रश्न पोलिस कर्मचारीच एकमेकांना विचारत आहेत.
नूतन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्याचा ‘चार्ज’ घेतल्यापासून अनेक धक्कादायक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातलाच एक म्हणजे सातारा शहर वाहतूक शाखा, सिटी पोलिस व शाहूपुरी पोलिस ठाण्यात वर्ग करणे. या निर्णयामुळे शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘आपले स्वतंत्र अस्तित्व हिरावून घेतले जाते की काय?’ या धास्तीने अनेक कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.
शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे हे महिन्यापूर्वी दुचाकीस्वाराच्या धडकेत जखमी झाले होते. उपचारासाठी ते वैद्यकीय रजेवर होते. नूतन पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वागतालाही ते येऊ शकले नव्हते. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांचा ‘दांडगा अनुभव’ लक्षात घेता वाहतूक शाखा त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्यातच वर्ग करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला गेला. मात्र, शहरात शाहूपुरी पोलिस ठाणेही कार्यरत असल्यामुळे वाहतूक शाखेची विभागणी करावी लागली आहे. सध्या वाहतूक शाखेत जवळपास ५८ पोलिस कर्मचारी असून, त्यापैकी ४० जण शहर पोलिस ठाण्यात तर बाकीचे १८ शाहूपुरीकडे पाठविण्याचा निर्णय झाला आहे. रजेवर असलेले सुरेश घाडगेही कदाचित शहर पोलिस ठाण्याकडेच वर्ग होतील.
वाहतूक शाखेच्या फाळणीच्या निर्णयाला दोन दिवस उलटले तरी अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. दोन दिवसांपासून ‘ड्यूटीवरचे लाडके काम’ आटोपून वाहतूक कर्मचारी संध्याकाळी वाहतूक शाखेतच येत आहेत. प्रत्यक्ष कार्यवाहीचा निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आता गाडी उचलल्यानंतर दोन ठिकाणी पळापळ
सध्या वाहतूक शाखेकडे असलेल्या खासगी तत्त्वावरील दोन्हीही क्रेन शहर पोलिस ठाण्याकडे ‘कामाला’ लावण्याचा हक्क ‘सिटी कारभाऱ्यांनी’ दाखविला असला तरी शाहूपुरी पोलिस ठाण्याने एका क्रेनची मागणी केली आहे. त्यामुळे या खासगी क्रेन नेमक्या कुणाच्या ताब्यात द्याव्यात, याचा पेच काही वरिष्ठांकडून सुटलेला नाही. दरम्यान, बोगदा-राजवाडा-मोतीचौक-राधिका चौक ते वाढेफाटा याच्या पश्चिम-उत्तरेकडे असणारा परिसर शाहूपुरीच्या अखत्यारित असल्याने येथे उचलल्या गेलेल्या दुचाकी शाहूपुरी पोलिस ठाण्यातच मिळणार आहेत. बाकी ठिकाणच्या दुचाकी मालकांना शहर पोलिस ठाण्याकडे जावे लागणार आहे. ज्या सर्वसामान्य सातारकरांना दोन पोलिस ठाण्यातील हद्दीचा गुंता सोडवता येणार नाही, त्या बिचाऱ्यांना मात्र आपली दुचाकी शोधण्यासाठी दोन्ही ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार आहेत, हे मात्र नक्की.