अवैध बांधकामावर पडणार हातोडा
By admin | Published: July 5, 2014 12:42 AM2014-07-05T00:42:59+5:302014-07-05T00:46:15+5:30
मलकापूर नगरपंचायत : १५ आॅगस्टपूर्वी कारवाई
मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या आज (शुक्रवारी) झालेल्या सभेत बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे सर्वाधिकार नगरअभियंत्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षणाअंती निदर्शनास आलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर १५ आॅगस्टपूर्वी कारवाई करावी. संबंधित मिळकतधारक किंवा बांधकाम व्यावसायिकांनी न काढल्यास ते बांधकाम पाडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ही कारवाई करण्यात नगर अभियंत्यांनी कसूर केल्यास त्यांची वेतनवाढ थांबविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शारदा खिलारे होत्या. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी हेमंत निकम, सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरपंचायतीच्या आजच्या सभेत विषयपत्रिकेवरील ३३ विषय व ऐनवेळच्या दोन विषयांसह ३५ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विषय क्रमांक ३१ हा विनापरवाना बांधकामाचा आढावा घेणे चर्चेसाठी घेण्यात आला. नगर अभियंत्यांनी प्रथमदर्शनी विनापरवाना बांधकामधारकांना तीन-तीन नोटिसा देऊनही संबंधित सात जणांनी बांधकामे सुरूच ठेवली असल्याचा अहवाल दिला. त्यावर उपनगराध्यक्ष शिंदे यांनी अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार नगरअभियंत्यांना द्यावेत, अशी सूचना मांडली. त्याला राजेंद्र यादव अनुमोदन दिले. त्यानंतर शिंदे यांनी १५ आॅगस्टपूर्वी कायदेशीर कारवाई करून संबंधित बांधकामे पाडण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. कोणताही संबंध नसताना विनाकारण बदनामी होते. ही कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत सर्व नगरसेवकांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर विषयनंबर २६ जिल्हा परिषद शाळांत गणवेश वाटपाचा विषय चर्चेत घेतला. हणमंत जाधव यांनी शाळांचा दर्जा खालावला असून, त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याची सूचना मांडली. त्यावर समिती स्थापन करून वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सर्व शिक्षकांची बैठक बोलावण्यात आली. रस्ते, स्ट्रीटलाईटचे गाळे टाकणे, बगीचे विकसित करणे या कामांना मंजूर दिली. (प्रतिनिधी)