कऱ्हाडात अतिक्रमणांवर अखेर हातोडा, पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:12 PM2020-02-26T14:12:00+5:302020-02-26T14:14:27+5:30
कऱ्हाड येथील दत्त चौकापासून विजय दिवस चौकापर्यंत पदपथ अतिक्रमणाने व्यापले होते. व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम करून तसेच प्रतिकृती व फलक उभारून पदपथावर पथारी पसरली होती. अखेर बुधवारी या अतिक्रमणांवर हातोडा पडला. कडक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्यात आली. काही ठिकाणी व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र, तरीही ही मोहीम राबविण्यात आली.
कऱ्हाड : येथील दत्त चौकापासून विजय दिवस चौकापर्यंत पदपथ अतिक्रमणाने व्यापले होते. व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम करून तसेच प्रतिकृती व फलक उभारून पदपथावर पथारी पसरली होती. अखेर बुधवारी या अतिक्रमणांवर हातोडा पडला. कडक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्यात आली. काही ठिकाणी व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र, तरीही ही मोहीम राबविण्यात आली.
कऱ्हाड शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका हा रस्ता शहरातील वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आणि याच रस्त्यानजीक मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ विस्तारली आहे. अनेक व्यावसायिकांनी हद्दीबाहेर पदपथापर्यंत आपले व्यवसाय थाटले होते.
काही व्यावसायिकांनी पायऱ्यांचे बांधकाम केले होते. तर काहींनी पत्र्याची शेड थाटली होती. काही ठिकाणी पदपथाबाहेर टपऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. दुकानातील वस्तूच्या प्रतिकृती उभारून पदपथ हायजॅक करण्यात आले होते. काहींनी तर दुकानातील वस्तूंची शो साठी पदपथावरच मांडणी केली होती. तसेच फलकही उभारण्यात आले होते. या सर्व परिस्थितीमुळे पादचाऱ्यांना पदपथ सोडून रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या भेडसावत होती.
मुख्य रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणाबाबत गत महिन्यात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घ्यावी, त्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले होते. त्यानंतर महिनाभर याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही.
अखेर बुधवारी सकाळीच पालिकेने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, मुख्याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए. आर. पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दत्त चौकापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दत्त चौक, कर्मवीर चौक, बसस्थानक परिसर ते विजय दिवस चौकापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये शेकडो अतिक्रमणे हटविण्यात आली.
जेसीबी, ट्रॅक्टरसह इतर वाहनांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी काही व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र, बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आणून देत ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली. सकाळी साडेअकरापर्यंत या परिसरात अक्षरश: धावपळ उडाली. अतिक्रमण हटविल्यामुळे बसस्थानक परिसरासह मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.