कऱ्हाडात ‘हात-घड्याळ’ आघाडी निश्चित!

By admin | Published: January 28, 2017 10:31 PM2017-01-28T22:31:43+5:302017-01-28T22:31:43+5:30

दोन्ही काँग्रेस अनुकूल : जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी व्यूहरचना; घोषणेवर शिक्कामोर्तब बाकी -- सुपर व्होट

'Hand-clock' lead in Karachi! | कऱ्हाडात ‘हात-घड्याळ’ आघाडी निश्चित!

कऱ्हाडात ‘हात-घड्याळ’ आघाडी निश्चित!

Next

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्याची सध्याची राजकीय अस्थिरता पाहता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसचे स्थानिक नेते आघाडी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यात आजपावेतो हस्ते परहस्ते निरोपांची देवाणघेवाणही झाली आहे. शनिवारी साताऱ्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही याला ग्रीन सिग्नल दिल्याचे वृत्त असून, आता आघाडीच्या घोषणेवर शिक्कामोर्तब होणेच बाकी असल्याची चर्चा दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
कऱ्हाड तालुक्यात दक्षिण आणि उत्तर असे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे दक्षिणचे नेतृत्व करीत आहेत.
तर उत्तरेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सध्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरी त्याला माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटाचा टेकू आहे. आज तालुक्याच्या राजकारणात
अनेक स्थित्यंतरे झाल्याने पंचायत समितीवर कोणत्या पक्षाचा
झेंडा फडकेल हे निश्चित सांगता येत नाही.
राज्यात आणि देशात सत्ता असणाऱ्या भाजपने कऱ्हाड तालुक्यात चांगलीच डोकेदुखी वाढवून ठेवली आहे. कऱ्हाड पालिका निवडणुकीतही भाजपने नगराध्यक्ष पदाची जागा जिंकून आपला करिष्मा दाखवून दिला आहे.
होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतही स्वबळाचा नारा देत कमळ फुलविण्याचा इरादा व्यक्त केल्याने अनेकांनी त्याची धास्ती घेतली आहे. उंडाळकर-भोसले यांचे मैत्रिपर्व संपले असले तरी मोहिते-भोसलेंच्या मनोमिलनाची हवा वाहत असल्याने पृथ्वीराज चव्हाण गटही बराच बॅकफूटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी कऱ्हाड तालुका विकास आघाडीची घोषणा करीत कऱ्हाड दक्षिणबरोबरच कऱ्हाड उत्तरेतही चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. कऱ्हाड नगरपलिकेतील
सत्ता गमावलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचीही उत्तरेत दमछाक होण्याची शक्यता निर्माण
झाली आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हातात हात घालण्याची ही योग्य वेळ वाटत होती; पण पक्षादेशाचं काय, हा खरा प्रश्न होता. (प्रतिनिधी)

माजी मुख्यमंत्र्यांशी तुम्हीच बोला ! : रामराजेंची सूचना
सातारा : अ‍ॅड. राजाभाऊ उंडाळकर-पाटील यांच्यावरच राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी दुपारी अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीला रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजेश पाटील-वाठारकर, अ‍ॅड. राजाभाऊ उंडाळकर-पाटील यांची उपस्थिती होती. ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी का?,’ अशी इच्छा अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केली. त्यावर ‘त्यांची इच्छा असेल तर चर्चा करायला हवी, तुम्ही स्वत:च त्यांच्याशी याबाबत बोला,’ अशी सूचना रामराजेंनी त्यांना केली. दरम्यान, या बैठकीत पक्षाच्या आगामी धोरणासंदर्भात सखोल चर्चा झाली. सकाळी साडेअकरा वाजता बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल तासभर चर्चा सुरू होती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्ह्यातील ६४ गट व १२८ गणांसाठी प्रत्येकी तीन नावे निवडण्यात आली आहेत, त्याची यादी या बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते. या यादीतील प्रत्येकी दोन नावांची निश्चित करण्यात यावी, अशी सूचना वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली आहे. याबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.


घडामोडींकडे लक्ष
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना समविचारी पक्षांना बरोबर घेणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून शनिवारी साताऱ्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही कऱ्हाड तालुक्यात आघाडी करण्याबाबत दोन ज्येष्ठ नेत्यांनी अनुकूलता दाखविली असून, ‘रेठरेकर दादा’ अन् ‘उंडाळकर भाऊ’ यांच्यावर त्याबाबतची जबाबदारी टाकल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे आता घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Web Title: 'Hand-clock' lead in Karachi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.