‘हाताची बोटे’ वेगवेगळी : घड्याळालाही बसेना लवकर ‘चावी’...

By Admin | Published: October 2, 2014 09:45 PM2014-10-02T21:45:39+5:302014-10-02T22:25:14+5:30

आघाडी फुटली; नेतेमंडळी विखुरली

'Hand fingers' are different: The watch also starts with 'Chawki' early ... | ‘हाताची बोटे’ वेगवेगळी : घड्याळालाही बसेना लवकर ‘चावी’...

‘हाताची बोटे’ वेगवेगळी : घड्याळालाही बसेना लवकर ‘चावी’...

googlenewsNext

नितीन काळेल - सातारा  --‘सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटलेला नाही. त्यासाठी अनेक कुटुंबातही कलह पाहिला आहे. राजकारणातून सत्ता मिळवायची झाले तर एकाच घरातील परस्पर पक्षातून लढणारेही आपण पाहिले आहेत. असेच काहीसे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत असून, आघाटी फुटल्यानंतर यावेळी निवडणुकीत ‘हाता’ची बोटे वेगवेगळी दिसत आहे. उमेदवारीसाठी काँग्रेसला सोडून अनेकांनी दुसरा घरोबा केला आहे. असे प्रथमच दिसत आहे. दुसरीकडे घड्याळालाही ‘चावी’ बसत नसल्याचे चित्र आहे. पूर्वीच्या काळी निवडणुका म्हटले की कार्यकर्त्यांच्या जीवावर त्या लढविल्या जात. मोजकेच उमेदवार व थोडेच पक्ष असत. अलीकडच्या काळात राजकीय पक्षांची संख्या वाढली, तसेच निवडणुकीत उतरणाऱ्यांचेही प्रमाण वाढले. अतिमहत्त्वकांक्षा अनेकांना अशा पदांकडे घेऊन जाऊ लागली. त्यामुळे आताच्या निवडणुकांना वेगळेच स्वरूप येऊ लागले आहे. राज्यात अनेक वर्षे आघाडी आणि युती कार्यरत होती; पण त्यांच्यातही अधिक महत्त्वकांक्षेमुळे फाटाफूट झाली. त्यामुळे प्रत्येकजण आता आपापले बळ दाखवू पाहत आहे. परिणामी राज्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात तोडफोडी आणि जोडाजोडी झाली आहे. अनेक पक्षांनाही काही ठिकाणी सक्षम उमेदवार मिळाले नाहीत, असेही चित्र आहे. अशा या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही निवडणुकीमुळे बरीच उलथापालथ झालेली आहे. अधिक करून काँग्रेसकडे ती आहे. आतापर्यंत एकसंध (दोन गट असतानाही) असलेल्या काँग्रेसचे बरेच शिलेदार इकडून तिकडे गेले आहेत. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत निष्ठावंत राहिले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीत असणारेही अपक्ष उभे राहून स्वपक्षाला एकप्रकारे आव्हान देत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. येथून अनेक वर्षे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे ते अपक्ष लढत आहेत. मागील निवडणूक कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचा डॉ. अतुल भोसले हे भाजपमध्ये जाऊन कऱ्हाड दक्षिणमधून लढत आहेत. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनीही आतात ‘हातात’ धनुष्यबाण घेतला आहे. ते वाई मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी ऐनवेळी हात सोडला आणि घड्याळाला चावी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सदाशिवराव पोळ यांना पाठिंबा दिला आहे. १९९५ मध्ये युतीच्या लाटेत तत्कालीन जावळी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार सदाशिव सपकाळ हे मागील निवडणुकीत काँग्रेसमध्ये आले होते. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना उमेदवारी मात्र मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अर्ज माघारी घेतला. सध्या ते तटस्थच आहेत. दुसरीकडे माण तालुक्यातील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी माणमधून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. पक्षाने सदाशिवराव पोळ यांना दिली आहे. देसाई यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निवडणुकीत रंगत आणली आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शेवटपर्यंत विनवण्या करण्यात आल्या; पण पेटून उठलेल्या देसाईंची चावी काही घड्याळाला बसलीच नाही. कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे हेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रिंगणात उतरले आहेत. आगामी काळात प्रचाराच्या फैरी आणि आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळले जाणार आहे.

जावळी-महाबळेश्वरमध्यही स्थित्यंतर...
जावळी तालुक्यात सदाशिव सपकाळ होते तेव्हा काँग्रेसची ताकद दखल घेण्याइतपत तरी होती. पण, त्यांच्या भाजप प्रवेशानंतर ताकद क्षीण झाली आहे. तेथे सातारा-जावळी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला पदाधिकारी व कार्यकर्ते मिळविताना अनेक समस्या येणार आहेत. महाबळेश्वर येथील व जुने काँग्रेसचे नेते बावळेकर हे सेनेत गेल्याने तेथेही हाताची ताकद कमी झाली आहे. माणमधील काँग्रेसचे विश्वंभर बाबर व सहकारी निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हेही महत्त्वाचे आहे. तसेच येथील काँग्रेसचे वाघोजीराव पोळ यांनी पाठीमागेच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Web Title: 'Hand fingers' are different: The watch also starts with 'Chawki' early ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.