जिल्ह्यात ६०९ ग्रामपंचायतीत हाताला काम; रोजगार हमी योजनेवर सात हजारांवर मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:26+5:302021-03-10T04:38:26+5:30
सातारा : दहा महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर असताना, जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांमुळे मजुरांना मोठा आधार मिळाला. आताही जिल्ह्यातील १ ...
सातारा : दहा महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर असताना, जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांमुळे मजुरांना मोठा आधार मिळाला. आताही जिल्ह्यातील १ हजार ४९८ पैकी ६०९ ग्रामपंचायतींत रोजगार हमीची कामे सुरू आहेत. याअंतर्गत सिंचन विहीर, घरकुल, वृक्ष, फळबाग लागवड अशी कामे करण्यात येत असून, ७ हजारांवर मजुरांना काम मिळाले आहे.
जिल्ह्यातील हजारो मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आधार ठरू लागली आहे. कारण केंद्र शासनाची ही योजना असून, आर्थिक वर्षात एका कुटुंबाला १०० दिवसांचा रोजगार यामधून देण्यात येतो. पूर्वी रोजगार हमीच्या कामावर असणाऱ्या मजुराला दिवसाला २०६ रुपये दिले जायचे. पण, गेल्यावर्षी एप्रिलपासून मजुरी दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाला २३८ रुपये मजुरांना मिळत आहेत. त्यातच आठ दिवसांत पैसे बँक खात्यावर जमा होतात. परिणामी ही योजना फायदेशीर ठरू लागलीय.
सातारा जिल्ह्यात सध्या १ हजार ७१३ कामे सुरू आहेत. त्यावर ७ हजार ३११ मजूर काम करतात. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक २६२ कामे सुरू असून, ७१२ मजूर काम करतात. खटाव तालुक्यात सध्या २४० कामे सुरू आहेत, तर या कामांवर १ हजार १०३ जण आहेत. माण तालुक्यातही विविध प्रकारच्या २२३ कामांना सुरुवात झालेली आहे. या तालुक्यात १ हजार ५१ जणांना रोजगार मिळालाय.
रोजगार हमी योजनेंतर्गत सिंंचन विहीर, घरकुल, वृक्ष लागवड, फळबाग लागवड आदी विविध कामे सुरू आहेत. या कामांच्या माध्यमातून मजुरांना आधार मिळत आहे. त्यामुळे शासनाची रोजगार हमी योजना हक्काचे पैसे मिळवून देण्यास सक्षम ठरलीय, हे निश्चित आहे.
रोहयोचा आराखडा
२६१४४७
जिल्ह्यातील एकूण जॉब कार्डधारक
१७१३
सध्या सुरू असलेली रोहयोची कामे
......................................................
सर्वात कमी रोजगार जावळी, महाबळेश्वर तालुक्यात
जिल्ह्यात सतत रोजगार हमी योजनेची कामे सुरू असतात. या योजनेंतर्गत विविध कामे घेता येतात. मागेल त्याच्या हाताला काम मिळते. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कामाची मागणी करावी लागते. सध्या जिल्ह्यातील जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात कमी कामे सुरू आहेत. जावळीत २७ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी कामे सुरू असून, १९० जणांना रोजगार मिळाला आहे; तर महाबळेश्वरमध्ये २४ ग्रामपंचायतीअंतर्गत रोजगार हमीच्या कामांना सुरुवात झाली आहे. या तालुक्यात २५१ मजुरांच्या हाताला काम मिळालेले आहे.
................................................................
तालुकानिहाय स्थिती
तालुका ग्रामपंचायती कामे सुरू असणाऱ्या ग्रामपंचायती
सातारा १९४ ४६
कऱ्हाड १९८ १०२
जावळी १२५ २७
पाटण २३८ ७९
वाई ९९ ४५
माण ९५ ५५
खटाव १३३ ८०
फलटण १२८ ७०
खंडाळा ६३ ४०
कोरेगाव १४२ ४१
महाबळेश्वर ७९ २४
.......................................
कोट :
कोरोना काळात सर्व कामे बंद होती. मात्र, आम्हाला रोजगार हमी योजनेच्या कामाने जगविले. त्यामुळे कोरोनाचा एवढा परिणाम आमच्यावर झाला नाही. आताही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामावर आहे. या कामाचे पैसे बँक खात्यावर जमा होतात. मागणी केल्यानंतर कामाची उपलब्धता होते. त्यामुळे ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
- राजाराम चव्हाण, मजूर
...............................
पूर्वी कामं मिळवायला लागायची. पावसाळ्यात व उन्हाळ्यात कामे कमी असायची. पण, रोजगार हमीची कामे सतत सुरू असतात. त्यामुळे सारखं हाताला काम मिळत आहे. पण, अजूनही रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरीचा दर कमीच आहे. तो आणखी वाढवला, तर मजुरांना चांगले दिवस येतील.
- शामराव पवार, मजूर
फोटो नाहीत...
......................................................................................