हस्तलिखित दाखला ठरणार आता अवैध
By admin | Published: August 31, 2014 09:36 PM2014-08-31T21:36:02+5:302014-09-01T00:05:51+5:30
जी. श्रीकांत : ग्रामपंचायतींनी संगणकीकृत दाखले देणे बंधनकारक
सातारा : ‘जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रातून नागरिकांना १९ प्रकारचे संगणकीकृत दाखले दिले जातात. त्यामुळे हाताने लिहिलेले दाखले पूर्णपणे अवैध ठरणार असून, ग्रामपंचायतींनी संगणकीकृत दाखले देणे बंधनकारक आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ग्रामविकास विभागाच्या एक नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार हस्तलिखित, छापील स्वरूपातील दाखले देणे पूर्णत: बंद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी दाखले हे फक्त संगणकीकृत स्वरूपातच देण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रतिदाखला २० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील दाखला, हयातीचा दाखला तसेच निराधार योजनेसाठी वयाचा दाखला नि:शुल्क दिला जाणार आहे.
या सर्व सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. तरीही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती हस्तलिखित किंवा छापील दाखले व प्रमाणपत्रे देत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे दाखले देणे अवैध आहे.
यापुढे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी दिलेले संगणकीकृत दाखलेच अधिकृत मानले जाणार आहेत. हस्तलिखित, छापील दाखले देणाऱ्या ग्रामपंचायती व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)