हापूस आवाक्याबाहेरच..!
By admin | Published: May 22, 2014 12:07 AM2014-05-22T00:07:49+5:302014-05-22T00:22:33+5:30
फलटण : कलिंगड, टरबुजाची आवक वाढली
फलटण : सध्या सर्वच क्षेत्रात महागाईन उच्चांक गाठला आहे. त्यातच उन्हाळा तीव्र होत असून कलिंगड, टरबुजाबरोबर नव्याने दाखल झालेल्या विविध प्रकारच्या आंब्यांनाही मागणी आहे. पण फळांचा राजा म्हणून ओळखला जाणार्या हापूसचा दर अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तालुक्यात सध्या ग्रामीण भागातील यात्रांचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्या निमित्ताने शहरासह ग्रामीण भागात कलिंगड, टरबूज फळांचे स्टॉल लागले आहेत. कलिंगडाचे आकर्षण सर्वांनाच असल्याने आजच्या स्थितीत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या खिशाला परवडणार्या दरात लाहन-मोठ्या आकारात कलिंगड मिळत आहे. त्यामुळे कलिंगडाच्या खरेदीकडे कल अधिक आहे. त्या तुलनेत टरबूज महाग असल्याने खरेदी करणारा ठराविक वर्गच दिसत आहे. दोन आठवड्यांपासून विविध प्रकारचे आंबे बाजारात विक्रीस आले आहेत. पण, दराची स्थिती परवडण्यासारखी नाही. येथील बाजारपेठेत मद्रास पायरीचा दर ३३० ते ४०० रुपये डझन आहे. विक्रेत्यांकडे हापूस विक्रीला आलेला आहे. पण दर अद्यापही ४०० ते ५०० रुपये डझन असून देवगड हापूस पहावयासही मिळत नाही. (प्रतिनिधी)