मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:11+5:302021-01-22T04:36:11+5:30
नवनाथ कमलेश्वर क्षेत्री (रा. संजयनगर, मसूर, ता. कराड, मूळ रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सरकारी वकील राजेंद्र ...
नवनाथ कमलेश्वर क्षेत्री (रा. संजयनगर, मसूर, ता. कराड, मूळ रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ओळखीतील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून ओळखीच्या महिलेच्या घरी ठेवले होते. त्या महिलेच्या घरी त्याने मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. कराड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एस.ए.ए.आर.औटी यांच्यासमोर सुरू होती.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी तीन महत्त्वपूर्ण साक्षीदार तपासले. पीडित मुलीचा जबाब व सत्यता न्यायालयाने तपासली. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व शंभर रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला पोलीस गोविंद माने, हवालदार मदने, हवालदार कार्वेकर यांनी सहकार्य केले.