अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:10+5:302021-04-07T04:41:10+5:30
सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत असताना आरोपी दयानंद साठे याने ...
सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत असताना आरोपी दयानंद साठे याने तिला फूस लावून पळवून नेले. तसेच निर्जन ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दयानंद साठे याच्यावर बालकांचा लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यासह अन्य कायद्यांन्वये गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीचा जबाब व सत्यता पडताळून न्यायालयाने आरोपी दयानंद साठे याला गुन्ह्यात दोषी धरून शिक्षा सुनावली.
पालकांच्या निगरानीखालून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तीन वर्षे शिक्षा व २ हजार रुपये दंड, तसेच दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद, धमकावल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड आणि बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तसेच दंड न दिल्यास आणखी एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल गोविंद माने, हवालदार अशोक मदने व कॉन्स्टेबल कार्वेकर, पवार यांनी काम पाहिले.