व्यापार करा पण, झाड तोडायचा ‘उद्योग’ नको; हरित साताराचे अभिनव आंदोलन

By प्रगती पाटील | Published: June 17, 2024 04:13 PM2024-06-17T16:13:58+5:302024-06-17T16:14:13+5:30

सातारा : व्यापार करताय करा पण झाड तोडायचा ‘उद्योग’ नको.., आम्हीं म्हणतोय वाचवायचं, ‘ह्यो’ म्हणतोय तोडायचं.. असे फलक घेऊन रस्त्यावर ...

Harit Satara agitation due to unknown youths cutting down the trees planted by the municipality | व्यापार करा पण, झाड तोडायचा ‘उद्योग’ नको; हरित साताराचे अभिनव आंदोलन

व्यापार करा पण, झाड तोडायचा ‘उद्योग’ नको; हरित साताराचे अभिनव आंदोलन

सातारा : व्यापार करताय करा पण झाड तोडायचा ‘उद्योग’ नको.., आम्हीं म्हणतोय वाचवायचं, ‘ह्यो’ म्हणतोय तोडायचं.. असे फलक घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सातारकरांनी आज राजपथावर मूक निदर्शने केली.

कमानी हौद ते जुना दवाखान्याच्या दरम्यान पालिकेने लावलेल्या झाडावर शनिवारी रात्री दोन अनोळखी तरुणांनी कोयता चालवत डेरेदार, सावली देणारे झाड तोडण्याचा उद्योग केला. एका जागरूक नागरिकाने या कृत्याचे मोबाईलवर शूटिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधिताने तिथून पळ काढला. तथापि तोपर्यंत झाडाच्या निम्म्याहून अधिक फांद्या तोडल्या गेल्या होत्या. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सातारकरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

अर्धवट तोडलेल्या झाडाचे जतन व्हावे, बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्यांवर पालिकेने कडक कारवाई करावी, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना आळा बसावा या हेतूने आज हरित सातारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी झाडाजवळ विविध जागृतीपर फलक हातात घेऊन मुक निदर्शने केली. यावेळी स्थानिक रहिवाशी व रिक्षा थांबा संघटनेचे सदस्यही मुक आंदोलनातआंदोलनात सहभागी झाले होते.

सलग आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीने झाड तोडण्याचा खोडसाळपणा केला आहे. ही बाब आम्ही नगरपालिकेच्या निदर्शनास आणून देत असून नगरपालिकेने लावलेले झाड बेकायदेशीरपणे तोडणाराचा शोध घेऊन त्याच्यावर वृक्ष अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेनुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी हरित साताराचे कार्यकर्ते उमेश खंडूजोडे व संजय मिरजकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.

या आंदोलनात ‘हरित सातारा’चे संजय मिरजकर, उमेश खंडूजोडे, सुधीर सुकाळे, संजय झेपले, अंकुश मांडवकर, दत्ता चाळके, दिलीप भोजने, निखिल घोरपडे, प्रकाश खटावकर, अमृता भोसले, साईराज पवार, अरुण मोहिते, शशिकांत मोहिते, मोहसीन शेख, फरुक सय्यद, राजेश तारू, संतोष भिलारकर, गणेश राजमाने, प्रकाश मराठे, शशिकांत देडगे, स्वराज मिरजकर, शैलेश साळुंखे, सोमनाथ भोसले, अमर रजपूत, नौशाद शेख, शौकत मुलाणी आदी सहभागी झाले होते.

पर्यावरणाचे सुविचार अन् झाडाची कत्तल

राजपथावर एका दुकानाचा बोर्ड स्पष्ट दिसत नाही म्हणून या डेरेदार झाडाची कत्तल करण्याचा प्रयत्न सजग सातारकरांनी हाणुन पाडला. हे झाड इतके दाट वाढले होते की त्याखाली बसायला दोन बाकडी ठेवण्यात आली होती. परिसरातील सजग नागरिक येथे असलेल्या फलकावर रोज पर्यावरणीय सुविचार लिहित होते. वृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न झाला त्यादिवशी आणि आजही सुचना फलकावर ‘झाडे लावा झाडे वाचवा’ असा संदेश लिहिण्यात आला होता.

राजपथावर झाडाची होणारी कत्तल थांबावी यासाठी आंदोलन केले. पर्यावरणासाठी झाडे लावता येत नसतील तर झाडे तोडूही नका असा संदेश आम्ही दिला आहे. विद्युत वाहिनीचे कारण सांगणाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात हे कुकर्म का केले याचा जाब पालिका प्रशासनाने संबंधितांना विचारावा आणि योग्य ती कारवाइ करावी. - संजय झेपले, पर्यावरणप्रेमी

Web Title: Harit Satara agitation due to unknown youths cutting down the trees planted by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.