सातारा : खटाव परिसरातील शिवारात गहू मळणीसाठी हार्वेस्ट मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:53 PM2018-03-02T12:53:28+5:302018-03-02T12:53:28+5:30
सध्या सर्वत्र रब्बी पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू आहे. खटावमध्ये रब्बी ज्वारीबरोबरच गव्हाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांची गहू मळणीची लगबग सुरू आहे. गव्हाची सुगी झटपट घरी नेण्यासाठी हार्वेस्ट मशीनचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
खटाव : सध्या सर्वत्र रब्बी पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू आहे. खटावमध्ये रब्बी ज्वारीबरोबरच गव्हाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांची गहू मळणीची लगबग सुरू आहे. गव्हाची सुगी झटपट घरी नेण्यासाठी हार्वेस्ट मशीनचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता लगबग सुगी उरकणाऱ्या मशीनचा वापर करताना दिसून येत आहे. पारंपरिक शेतीत गहू काढण्याकरीता लागणारा वेळ पाहता या हार्वेस्ट मशीनने ते केवळ एका तासाभरात होऊ लागले.
त्यामुळे शेतकरीही आता मजूर लावून वेळ वाया न घालवता कमीतकमी वेळात पिकांची मळणी करुन घरी धान्य आणण्याच्या गडबडीत आहेत. या मशीनमुळे आता गव्हाची मळणी झटपट व सोपी झाल्याने शेतकरी या यंत्राच्या सहाय्यानेच गहु काढत आहे.
एक एकराचे काम अर्धा तासात
मजुरांचा वाढता तुटवडा, तसेच वाढलेली मजुरी पाहता शेतकऱ्यांना हार्वेस्ट मशीनने मळणी करणे अधिक सोयीचे वाटते. पारंपरिक पध्दतीने गहु काढावयाचा म्हटला तर एका एकराला दहा ते बारा महिला मजूर लागतात. त्यांना गहू काढणीसाठी दिड पायली म्हणजेच साडेसात किलो गहू द्यावा लागतो. तसेच हा गहू मळण्याकरीता एका पोत्याला तीनशे रुपये प्रमाणे दर आहे.
हा गहू मळणीकरीता लागणारे मजुरांची मजुरी वेगळीच असते. यामध्ये सुगीपुर्ण होण्याकरीता काही दिवस लागतात. परंतु गहु काढण्याच्या या हार्वेस्ट मशीनमुळे शेतकऱ्याला आता सुगी झटपट उरकता येऊ लागली. एकरी बावीसशे रुपये दर देऊन पीक काढत असताना एकएकर क्षेत्रातील गहू अवघ्या अर्धा तासात काढून होतो.
पैशाची बचतही होत असल्याने आता आम्ही शेतकरी या मशीनने मळणी करणे पसंत करत आहोत, असे मत खटाव येथील शेतकरी शंकर घाडगे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.