रहिमतपूरच्या कुस्ती मैदानात हरियाणाच्या पै. विनोदकुमारने मारली बाजी
By Admin | Published: March 16, 2017 06:03 PM2017-03-16T18:03:41+5:302017-03-16T18:03:41+5:30
एक लाख रुपये बक्षीसासह मानाच्या चषकाचा मानकरी
आॅनलाईन लोकमत
रहिमतपूर : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे हजारो कुस्ती शौकिनांच्या साक्षीने झालेल्या रंगतदार लढतीमध्ये हरियानाच्या पै.विनोदकुमार याने पुण्याच्या पै. विष्णू खोसे याचा गुणांवर पराभव करीत कुस्ती मैदान मारले. तो एक लाख रुपये बक्षीसासह मानाच्या चषकाचा मानकरी ठरला.
रहिमतपूर येथील पद्माभूषण डॉ. वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि स्व.पै.गुलाबराव माने यांच्या स्मरणार्थ रहिमतपूर नगरपरिषद मैदानावर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले होते.
प्रारंभी नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष बेदील माने, यशवंत हाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संस्था सचिव शिवीजीराव माने, राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे जिल्हा सरचिटणीस संभाजीराव गायकवाड, सातारा तालीम संघाचे अध्यक्ष पै. साहेबराव पवार, महाराष्ट्र केसरी पै. धनाजी फडतरे, उपमहाराष्ट्र केसरी पै. बाळू पडघम, पै. चंद्रकांत सूळ, पै. आबा सूळ, पै.संदीप साळुंखे, पै. दिलीप पवार, यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
पै. विनोदकुमार आणि पै. विष्णू खोसे या तुल्यबळ मल्लांमध्ये तब्बल तेहतीस मिनीटे कुस्ती रंगली. शेवटी पंचांनी गुणांवर विजयी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पै. विनोदकुमारने गुण मिळवत पै. खोसे चा पराभव केला. लक्षवेधी लढतीमधील दुसऱ्या क्रमांकाची पै. अमोल फडतरे विरुध्द पै. गोकुळ आवारे यांच्यामधील कुस्तीत पै. गोकुळ आवारे याने पै. अमोल फडतरे ला आस्मान दाखवून एक लाख रुपयांचे बक्षीस मिळविले. त्याचबरोबर रोमहर्षक लढतीमध्ये पै. संदीप काळे याने पै. पांडुरंग मांडवे (मोठा) यांचा पराभव केला. पै. पांडुरंग मांडवे (छोटा) याने पै. तात्या करे याला आस्मान दाखविले. पै. रवि करे याने पै. ब्रिजेश ठकराल याचा पराभव केला. पै. शरद पवार याने पै. राहुल लवटे याला चितपट केले.