विधानपरिषदेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विजयाची हॅटट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:13 PM2022-06-20T22:13:05+5:302022-06-20T22:14:33+5:30
शरद पवार यांचा रामराजे यांच्यावर विश्वास असल्याने त्यांनी सत्ता असो किंवा नसो नेहमी निष्ठावंत रामराजे यांना राजकीय संधी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण: विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतर्फे फलटण शहर व तालुक्यात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत राज्याच्या राजकारणात सक्रिय असून शरद पवार यांचा रामराजे यांच्यावर विश्वास असल्याने त्यांनी सत्ता असो किंवा नसो नेहमी निष्ठावंत रामराजे यांना राजकीय संधी दिली आहे.
२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे पक्षाने त्यांची विधान परिषदेवर २०१० मध्ये संधी दिली. त्यांना पक्षाने आता तिसऱ्यांदा संधी दिली आहे. सभापतीपदी बहुधा निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधान परिषदेसाठी सकाळपासून मतदान सुरू होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रामराजे यांच्या विजयाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अनेक कार्यकर्ते मुंबईला पण रवाना झाले होते. विधानपरिषदेत रामराजेंचा विजय निश्चित होता, फक्त विजयाची घोषणा होणे बाकी होते. ती घोषणा आज सायंकाळी होताच फलटण शहर व तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी केली आपला आनंद उत्सव साजरा केला.