मैत्रिपर्वाच्या विजयाची ‘हॅट्ट्रिक’
By admin | Published: August 31, 2015 08:27 PM2015-08-31T20:27:22+5:302015-08-31T23:39:20+5:30
कऱ्हाडचं राजकारण: उंडाळकर-भोसलेंची बाजी, बाळासाहेबांच्या महाआघाडीचा पराभव
प्रमोद सुकरे- कऱ्हाड
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कऱ्हाड तालुक्यात माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या मैत्रिपर्वाला नव्याने सुरुवात झाली. विधानसभेतील पराभवाचा उट्ट्या काढण्यासाठी या दोघांनी चंगच बांधला. त्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीत उंडाळकर विजयी झाले. तब्बल दहा वर्षांनंतर ‘कृष्णा’ साखर कारखान्याच्या चाव्या भोसलेंच्या ताब्यात आल्या, तर सहा वर्षांपूर्वी गेलेली शेती उत्पन्न बाजार समितीची सत्ता पुन्हा ताब्यात घेत उंडाळकर-भोसले मैत्रिपर्वाने विजयाची हॅट्ट्रिक मारली आहे.
कऱ्हाड तालुक्याचे राजकारण अलीकडच्या काही वर्षांत अस्थिर बनले आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत समीकरणे बदलत आहेत. म्हणून तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ म्हणत डॉ. अतुल भोसले ‘जयवंत शुगर’ची साखर घेऊन दूध संघावर गेले अन् अॅड. उदय पाटलांनी ‘कोयने’चे पेढे भरवत नव्याने मैत्रिपर्व सुरू केले. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणातील संदर्भ पुन्हा एकदा बदलले.
या मैत्रिपर्वाने पहिल्यांदा विलासराव पाटील-उंडाळकरांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर ‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांचे पॅनेल विजयी झाले. या दोन्ही विजयानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला अन् त्यांनी आता लक्ष बाजार समिती, असा जणू नाराच दिला. हे दोन्ही गट तेव्हा पासून कामालाच लागले. अन् त्याचे फलित आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
सहा वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक महाआघाडी आकाराला आली. त्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, विलासराव पाटील-वाठारकर, भीमराव पाटील (दादा), जगदीश जगताप (दादा) अन् महाराष्ट्र केसरी दिवंगत संजय पाटील (दादा) यांच्या बरोबरीने डॉ. अतुल भोसले यांची साथ मिळाली अन् उंडाळकरांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लागला; पण गत सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. संजय पाटील हयात राहिले नाहीत.
तर डॉ. अतुल भोसलेच उंडाळकरांच्या गोटात शिरल्याने महतप्रयासाने ताब्यात घेतलेली बाजार समितीची सत्ता आघाडीच्या ताब्यात राहणार की उंडाळकर गट पुन्हा सत्ता हस्तगत करणार, याची उत्सुुकता लागली होती. आज विजयाच्या गुलालाने यावर शिक्कामोर्तब
झाले आहे.
त्यांच्या मनाची ‘दाद’ लागलीच नाही !
बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील सहा दादांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. त्यातील वडगावचे ‘दादा’ महाआघाडीकडे तर कालेचे ‘दादा’ मैत्रिपर्वाबरोबर राहिले. रेठऱ्याच्या दोन दादांच्या भूमिकेची दाद मात्र शेवटपर्यंत लागलीच नाही. अन् कऱ्हाड उत्तरेतील एका दादाने थेट विरोध करण्याचे ‘धैर्य’ दाखवले नाही. पण, शेतकरी संघटनेच्या दादांनी बाळासाहेबांच्या जीवाला ‘घोर’ पडेल, अशीच व्यवस्था मतदानातून केल्याची चर्चा आहे.
त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा तीन-चार तालुक्यांत विभागला गेला आहे. त्यामुळे याचं गणित बांधणं खूप अवघड मानलं जातं. तरीही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन दादांनी ‘मनो-धैर्य’ एकवटून बाळासाहेबांना थेट आव्हान दिले होते. मात्र मतविभागणीचा फायदा बाळासाहेबांनाच झाला. यातील मनोज घोरपडे हे सातारा तालुक्यातील; पण कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने घोरपडेंनी त्या ९१ गावांत दौरे करत मतदारसंघ जणू पिंजूनच काढला. त्यामुळे बाळासाहेबांचा खरा विरोधक आपणच आहोत, अशी छबी निर्माण करण्यात त्यांना यश आल्याचे मानले जाते.
महाआघाडीवर आत्मचिंतनाची वेळ
सहा वर्षांपूवी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आकाराला आलेल्या महाआघाडीसाठी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर विजयश्री खेचून आणण्यासाठी महाराष्ट्र केसरी दिवंगत संजय पाटील यांच्यासह अनेकांचा महत्त्वपूर्ण वाटा होता; पण त्या आघाडीत गत विधानसभेनंतर ‘बिघाडी’ला सुरुवात झाली. ती सहा वर्षांत थांबलीच नाही. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी आपल्याबरोबर कोण-कोण होतं अन् आता कोण-कोण आहे, याचं आत्मचिंतन महाआघाडीच्या नेत्यांनी केलं तर पराभवाची कारणमीमांसा करणं सोपं होईल.
युवा नेतृत्वांच्या प्रयत्नांना यश
या निवडणुकीत माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. सुरेश भोसले यांच्याबरोबर त्यांचे राजकीय वारसदार अॅड. उदय पाटील व डॉ. अतुल भोसले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ‘बाबा-दादां’नी तर जणू पायात भिंगरीच बांधली होती. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचेच निकालानंतर मानले जाते.
अस्तित्वाची लढाई जिंकली
बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण व आमदार आनंदराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. त्याला भोसले गटाची साथ लाभल्यानेच ही अस्तित्वाची लढाई जिंकली, अशी चर्चा आहे.