सहकारी संस्था निवडणुकीत उदयसिंह पाटलांची हॅट्रिक!, कराड तालुका खरेदी विक्री संघातही मारली बाजी

By प्रमोद सुकरे | Published: November 5, 2022 12:11 PM2022-11-05T12:11:25+5:302022-11-05T12:12:41+5:30

दिवंगत विलासराव पाटील यांच्या पश्चात त्यांनी आपली राजकीय पकड घट्ट करण्यास केली सुरुवात

Hattrick of Uday Singh Patil in cooperative society elections! Karad taluka also won in buying and selling team | सहकारी संस्था निवडणुकीत उदयसिंह पाटलांची हॅट्रिक!, कराड तालुका खरेदी विक्री संघातही मारली बाजी

सहकारी संस्था निवडणुकीत उदयसिंह पाटलांची हॅट्रिक!, कराड तालुका खरेदी विक्री संघातही मारली बाजी

googlenewsNext

कराड: कराड दक्षिण काँग्रेसचे नेते, माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील यांचे पुत्र अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी सहकारी संस्था निवडणुकात विजयाची हॅट्रिक मारली आहे. शामराव पाटील पतसंस्था, रयत सहकारी साखर कारखाना व त्या पाठोपाठ कराड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे वडिलांच्या पश्चात त्यांनी आपली राजकीय पकड घट्ट करायला सुरुवात केलेली दिसत आहे.

विलासराव पाटील -उंडाळकर यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग ७ वेळा विजय मिळवला होता. कराड तालुक्यातील अपवाद वगळता सर्व सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांनी पकड ठेवली होती. शिवाय जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर अनेक वर्षे हा दबदबा कायमच होता. मात्र मध्यंतरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्यात लक्ष घातल्याने जिल्हा बँक, जिल्हा परिषदेतील उंडाळकर यांचा प्रभाव कमी होत गेला. तर कराड दक्षिणच्या राजकारणातही उंडाळकरांना घेरण्यात विरोधक काही अंशी यशस्वी झाले.

माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या निधनानंतर प्रथमच जिल्हा बँकेची निवडणूक गतवर्षी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते, तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोसायटी गटातून अँड. उदयसिंह पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांना मदत केली. यात उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा पराभव झाला.

या निकालानंतर कराड तालुक्यातील राजकीय वातावरण बदलले. त्यानंतर उंडाळकरांच्या ताब्यात असणाऱ्या शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक लागली. त्यात अँड. उदयसिंह पाटील यांच्या विरोधात चुलत भाऊ राष्ट्रवादीचे अँड. आनंदराव पाटील यांनी पँनेल उभे केले. पहिल्यांदाच लागलेल्या या निवडणुकीत दक्षिण- उत्तर च्या विरोधकांनी रसद पुरवत रंग भरला. पण ती रसद कामी आली नाही हे निकालानंतर स्पष्ट झाले. अँड. उदयसिंह पाटील यांचेच पॅनेल फरकाने निवडून आले.

त्यानंतर रयत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. अँड.उदयसिंह पाटील यांच्या विरोधात पुन्हा अँड. आनंदराव पाटील यांच्या गटाने पॅनेल उभे केले. पण शेवटच्या दिवशी  आनंदराव पाटील गटाचे अर्ज मागे घेतल्याने ती निवडणूक बिनविरोध झाली. सध्या कराड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत जेवढ्या जागा तेवढेच अर्ज दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. हे सर्व अर्ज अँड. उदयसिंह पाटील यांच्या समर्थकांचे असल्याने याच पॅनेलच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून फक्त त्याची औपचारिकता बाकी राहिली आहे. या विजयाच्या हॅट्रिकने  उदयसिंह पाटील यांच्या गटात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. हे वातावरण भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी निश्चितच उपयोगी ठरेल.

विजयाचा चौकार मारणार का?

नजीकच्या काळात कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. या संस्थेवर अपवाद वगळता अनेक वर्ष दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटाचे वर्चस्व राहिले आहे . या निवडणुकीत अँड. उदयसिंह पाटील विजयाचा चौकार मारणार का? याकडे समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Hattrick of Uday Singh Patil in cooperative society elections! Karad taluka also won in buying and selling team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.