Satara: पाच इंच लांबीची इशारतीची तोफ पाहिलीय का?, वाईतील इतिहास अभ्यासकाच्या संग्रही तोफ

By सचिन काकडे | Published: January 15, 2024 05:39 PM2024-01-15T17:39:42+5:302024-01-15T17:40:46+5:30

कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले असता त्यांना एका कुटुंबाकडे ही तोफ आढळून आली

Have you seen the five inch signal cannon?, a cannon in the history scholar's collection in Wai | Satara: पाच इंच लांबीची इशारतीची तोफ पाहिलीय का?, वाईतील इतिहास अभ्यासकाच्या संग्रही तोफ

Satara: पाच इंच लांबीची इशारतीची तोफ पाहिलीय का?, वाईतील इतिहास अभ्यासकाच्या संग्रही तोफ

सचिन काकडे

सातार : वाईत राहणारे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला असून, त्यांच्या शस्त्र संग्रहात नुकतीच एक इशारतीची तोफ दाखल झाली आहे. लांबी पाच इंच, अत्यंत सुंदर नक्षीकाम व ब्रांझ धातूपासून घडविण्यात आलेली ही तोफ १८व्या शतकातील आहे.

प्रसाद बनकर यांनी २२ वर्षांपासून शस्त्रास्त्रांचा संग्रह व त्यांचे संवर्धन करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या संग्रहात शिवकालीन तलवार, भाले, बरचे, वाघनखे, बिचवा, दांडपट्टे , मराठा धोप तलवार, चिलानम, ढाल व ढालीचे विविध प्रकार, ब्रिटिशकालीन तलवारी, बंदुका, बारूददान यांसह १४व्या आणि १५व्या शतकातील हजारो शस्त्रे आहेत. विविध धातूपासून बनविण्यात आलेल्या देवी देवतांच्या मूर्ती, दुर्मीळ दिवे, १२ हजारांपेक्षा जास्त जुन्या नाण्यांचा संग्रहदेखील त्यांनी केला आहे.

त्यांच्या संग्रहात १० ईशारतीच्या तोफा असून, नुकतीच एक तोफ त्यांच्या संग्रहात दाखल झाली आहे. कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले असता त्यांना एका कुटुंबाकडे ही तोफ आढळून आली. या तोफेचे महत्व जेव्हा त्या कुटुंबीयांना सांगण्यात आले तेव्हा त्यांनी ही तोफ जतनीकरणासाठी बनकर यांना देऊ केली. केवळ ५ इंच लांबीची ही तोफ त्यांच्या संग्रहातील सर्वांत लहान तोफ आहे.

..यासाठी व्हायचा वापर

अशा प्रकारच्या तोफा १६व्या शतकापासून १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत पाहायला मिळतात. या तोफा त्या काळातील राजघराणे, सरदार घराणे किंवा मोठ्या व्यक्तींच्या वाड्यात, देवघराबाहेर ठेवल्या जात असत. जत्रेच्या वेळी घरातील देव पालखीमध्ये बसवून पालखी बाहेर येताना अथवा देव वाड्याबाहेर पडले आहेत, याची इशारत देण्यासाठी या तोफेमध्ये गुलाल भरून व दारूगोळा भरून बत्ती दिली जायची. म्हणूनच अशा तोफांना ‘ईशारतीच्या तोफा’ हे नाव दिले गेले असावे, असा कयास इतिहास अभ्यासकांकडून बांधला जात आहे.

..अशी आहे तोफ

  • ओतीव प्रकार
  • कालखंड १८वे शतक
  • ब्रांझ धातूपासून घडण
  • लांबी ५ इंच
  • तोफेच्या तोंडाचा व्यास १.५ इंच
  • वजन ५८० ग्रॅम

इशारतीच्या तोफांच्या नळकांड्याची (बॅरल) लांबी ५ इंचापासून २४ इंचापर्यंत पाहण्यास मिळते. या प्रकारच्या तोफांवर सुंदर नक्षीकामदेखील आढळते. अशा तोफा पोलाद, पितळ, ब्रांझ किंवा पंचधातूपासून बनवण्यात येतात. गेली वीस वर्षे या शस्त्रांच्या माध्यमातून छत्रपती शिवराय, विविध सरदार तसेच आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपुढे मांडण्याचा प्रत्यन मी करत आहे. - प्रसाद बनकर, आजीव सदस्य, भारत इतिहास संशोधक मंडळ
 

Web Title: Have you seen the five inch signal cannon?, a cannon in the history scholar's collection in Wai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.