नेत्यांच्या इच्छाशक्तीचा कहर; विरोधकांच्या राजकारणाला बहर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:45+5:302021-02-12T04:37:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक हे राष्ट्रवादीचे सत्ताकेंद्र आहे. या सत्ताकेंद्रात नेत्यांकडून दबावतंत्राचे अस्त्र वापरले जात ...

The havoc of the will of the leaders; Opposition's politics flourishes! | नेत्यांच्या इच्छाशक्तीचा कहर; विरोधकांच्या राजकारणाला बहर!

नेत्यांच्या इच्छाशक्तीचा कहर; विरोधकांच्या राजकारणाला बहर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक हे राष्ट्रवादीचे सत्ताकेंद्र आहे. या सत्ताकेंद्रात नेत्यांकडून दबावतंत्राचे अस्त्र वापरले जात असून पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारणाला बळ मिळू लागले आहे. नेत्यांची ताकद ही पक्षाच्या जीवावर तयार झालेली असली, तरी आता हीच वाढलेली ताकद पक्षासाठी मारक ठरतेय. राष्ट्रवादीच्या सत्ताकेंद्राला धक्के देण्यासाठी इतर पक्ष हीच ताकद आजमावताना पाहायला मिळत आहेत. नेत्यांच्या इच्छाशक्तीचा ‘कहर’ पाहून विरोधकांच्या राजकारणाला ‘बहर’ आलाय!

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या या बँकेवर दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचा १९८७ पासून एकछत्री अंमल होता. काकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे बँकेवर वर्चस्व होते. तेव्हासुद्धा काँग्रेसपेक्षा उंडाळकरांची व्यक्तिगत ताकद मोठी होती. काका म्हणतील तेच बँकेत घडायचे. त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत होती. साहजिकच, बँकेवर काकांचे वर्चस्व राहिले.

हेच वर्चस्व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांंना खटकत होते. तेव्हा २००७ मध्ये झालेल्या बँकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी काकांचे वर्चस्व उलथवून टाकत बँकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. सलग १५ वर्षे राष्ट्रवादी जिल्हा बँकेवर मांड ठोकून आहे. दिवंगत लक्ष्मणराव पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, दिवंगत दादाराजे खर्डेकर या मंडळींचे बँकेवर वर्चस्व निर्माण झाले. ही सर्व मंडळी पक्ष म्हणून एकत्र राहिल्याने बँकेवर राष्ट्रवादीचा अंमल राहिला.

दरम्यान, जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेले. शिवेंद्रसिंहराजेंचे बँकेत मोठे वजन आहे. त्यांना मानणारे जवळपास सहा संचालक आहेत. आता तेच भाजपमध्ये जाऊन बसल्याने राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झालाय. आतापर्यंत एकसंधतेनं राहिलेला राष्ट्रवादी पक्ष सध्याच्या घडीला विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. याच घडामोडींमध्ये शिवेंद्रसिंहराजेंची वाढलेली ताकद ही भाजपला पोषक, तर राष्ट्रवादीला मारक ठरणार असल्याने राष्ट्रवादीपुढे चिंतेचे ढग दिसू लागले. ही परिस्थिती राष्ट्रवादीचे नेतेमंडळी कशा प्रकारे हाताळतात, हे पाहण्याजोगे ठरेल.

चौकट...

राष्ट्रवादीचे ‘पितामह’ आज देणार संदेश

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारिणी समितीची शुक्रवारी (दि. १२) बँकेत सभा होणार आहे. या सभेच्या आधी आणि त्यानंतर बरीच खलबते होणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यातील द्वंद्वाच्या निमित्तानेदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पितामह रामराजे नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीला राहणार असून ते कोणता संदेश देतात, याबाबतही उत्सुकता ताणली आहे.

चौकट..

दादांच्या इशाऱ्यानंतरच निर्णय

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी एकत्रित येऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेत १५ वर्षांपूर्वी सत्तांतर केले. आता सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष पेचात सापडलेला आहे. बारामतीतून ज्या सूचना होतील, त्यानुसारच जिल्हा बँकेसाठी व्यूहरचना आखली जाणार आहे.

लोगो : जिल्हा बँकेचे रणांगण

जिल्हा बँकेचा फोटो वापरावा

Web Title: The havoc of the will of the leaders; Opposition's politics flourishes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.