Satara Crime: ..म्हणून ‘तो’ चक्क दरोडेखोर बनला, हातात पैसा खेळायला लागला; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 03:37 PM2023-01-31T15:37:05+5:302023-01-31T15:37:34+5:30
अचानक सुधारलेली त्याची आर्थिक परिस्थिती इतरांच्या नजरेतून मात्र सुटली नाही.
सातारा : भावाभावांतील वाद आपण सर्रास सर्व ठिकाणी पाहत असतो. संपत्तीवरून एकमेकांचा जीव घेण्याइतपत हा वाद विकोपाला जातो. असे चित्र एकीकडे दिसत असताना एक भाऊ मात्र, भावाच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी पहिली चोरी करतो. यातून त्याची आर्थिक गरज भागते; मात्र, पुढे ही गरजच त्याची सवय बनून तो दरोडेखोर म्हणून ओळखला जाऊ लागतो. ही कहाणी एखाद्या चित्रपटातील नसून, सातारा पोलिसांनी पकडलेल्या एका अट्टल चोरट्याची आहे.
सातारा तालुक्यातील वडूथ हे संजय मदने (वय ४२) याचे गाव. पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा त्याचा परिवार. अल्पभूधारक असलेला संजय हा दुसऱ्याच्या शेतात मजुरी करीत होता. एकत्र कुटुंब असताना १० वर्षांपूर्वी त्याच्या भावाला कॅन्सरचे निदान झाले. त्याच्या उपचारासाठी पैसे कोठून आणायचे म्हणून त्याने पत्नीचे दागिने गहाण ठेवले. या पैशांतून त्याने भावावर उपचार केले. मात्र, तरीही त्याचा भाऊ वाचला नाही. आता गहाण ठेवलेले दागिने कसे सोडवायचे, या विवंचनेत तो असताना त्याने यावर उपाय म्हणून चोरीचा मार्ग स्वीकारला.
पहिली चोरी त्याने स्वत:च्या गावातच केली. यातून काही पैसे त्याच्या हाताला लागले. सहज आणि कमी वेळात बक्कळ पैसा मिळत असल्याने त्याला मजुरी करण्याऐवजी चोरीचा मार्ग खुणावू लागला. सुरुवातीला एकटाच बंद घरे हेरून चोरी करू लागला. सातारा, कोरेगाव तालुक्यात दिवसा तो फिरायचा. घरातून कामानिमित्त बाहेर जातोय, असे सांगून तो निघायचा. पण, रात्री चोरी करूनच परत यायचा.
हातात पैसा खेळायला लागल्यानंतर अचानक सुधारलेली त्याची आर्थिक परिस्थिती इतरांच्या नजरेतून मात्र सुटली नाही. ही माहिती कानोकानी पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने घरफोडीची कबुली दिली. या घरफोडीच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच तो कारागृहात गेला. पण, कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो छोटामोठा नव्हे, तर अट्टल दरोडेखोर बनला.
एक वर्षे कारागृहात
संजय मदने हा आठ वर्षांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच कारागृहात गेला. एक वर्ष तो कारागृहात होता. त्यानंतर तो बाहेर आला. आपण आता सुधारलोय, असं तो इतरांना भासविण्याचा प्रयत्न करायचा. मात्र, वाघाच्या तोंडाला एकदा का रक्त लागलं की तो शिकार करणं सोडून देत नाही, तसंच संजय मदनेच्या ताेंडाला गुन्हेगारीचं रक्त लागलं होतं. त्याने पाच वर्षांत १७ हून अधिक ठिकाणी घरफोड्या केल्या. त्याचं अक्षरश: राहणीमान बदलून गेलं. कित्येक वर्षे पोलिसांच्या यादीवर दुर्लक्षित असलेला संजय पुन्हा रेकाॅर्डवर आला.