साताऱ्यात बंद घर फोडून १३ तोळे सोने लंपास- नागठाणे, अतीत येथे मटका अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 07:27 PM2019-08-14T19:27:11+5:302019-08-14T19:27:29+5:30
घरातून तब्बल १३ तोळे सोने आणि एक लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ....मटकाविरोधी कारवाईत सुमारे दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात करण्यात आला.
सातारा : शहराच्या उपनगरातील विलासपूरमध्ये राहणाºया वसंतराव हणमंत जाधव (वय ७६,
रा. राधिका नगर, प्लॉट न. ३७) यांच्या घरातून तब्बल १३ तोळे सोने आणि एक लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसंतराव जाधव हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते पत्नीसमवेत विलासपूर येथे राहतात. त्यांची मुले पुणे येथे नोकरीला आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील तेरा तोळ्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरट्यांनी चोरली. त्याच वेळी जाधव यांना जाग आली, त्यांनी आरडाओरड केला तसेच चोरट्यांना शिवीगाळ केली; मात्र भीतीने ते पुढे गेले नाहीत. अखेर चोरट्यांनी ऐवज घेऊन पलायन केले.
दरम्यान सकाळी त्यांनी हा प्रकार आपल्या पुणे येथे राहणाºया मुलांना सांगितला. मुले तत्काळ साताºयात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या परिसरामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडतात का? हे पोलिसांनी पाहिले; मात्र पोलिसांना काहीही सापडले नाही. या चोरीच्या प्रकारामुळे वृद्ध दाम्पत्य दहशतीखाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नागठाणे, अतीत येथे मटका अड्ड्यावर छापा
सहाजण ताब्यात : रोकडसह मोबाईल जप्त
नागठाणे : सहायक पोलीस अधीक्षक कार्यालय व बोरगाव पोलिसांनी नागठाणे व अतीत (ता. सातारा) येथे संयुक्तपणे केलेल्या मटकाविरोधी कारवाईत सुमारे दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात करण्यात आला. याप्रकरणी सहाजणांवर कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
अतीत व नागठाणे येथे मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी व बोरगाव पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी नागठाणे येथे चौकात एका इमारतीच्या आडोश्याला कल्याण मटका घेत असताना राजेंद्र विश्वनाथ कमाने (वय ४०), अजित पोपट कमाने (वय ३३, दोघे, रा. नागठाणे, ता. सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाईल व १३ हजारांची रोकड असा सुमारे ५६ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. दुसरी कारवाई पोलिसांनी अतीत बसस्थानकाच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये केली. या ठिकाणी रोहित सुरेश यादव (वय २२), हणमंत भिकू भोसले (वय ५८), धनंजय बाळू भोसले (वय ३२) व कृष्णा साधू मुल्ल्या (वय २८) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी, पाच मोबाईल, मटका घेण्याचे साहित्य व रोख २० हजार रुपये असा सुमारे दोन लाख तीन हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, इनायत्तुला महामुदखान मुल्ला, अंकुश रामराव यादव, चालक मनोज मोहन शिंदे व बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.