घंटागाडीच्या गाण्यामुळे त्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:36+5:302021-07-14T04:43:36+5:30
लोकमत न्यजू नेटवर्क सातारा : घंटागाड्यांच्या गाण्यांमुळे नगरपरिषदेचे अस्तित्व मान्य करताना त्यांनी स्वच्छता विकासाची अप्रत्यक्ष कबुलीदेखील आपणहून दिली आहे. ...
लोकमत न्यजू नेटवर्क
सातारा : घंटागाड्यांच्या गाण्यांमुळे नगरपरिषदेचे अस्तित्व मान्य करताना त्यांनी स्वच्छता विकासाची अप्रत्यक्ष कबुलीदेखील आपणहून दिली आहे. त्यांनी केलेल्या टीकात्मक सूचनांचा आदर करून सातारकरांसाठी सातारा विकास आघाडी अधिक गतीने कार्यरत राहील,’ अशी टीका सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कोणाचेही नाव न घेता केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, नागरिकांवर आता हंडा मोर्चा काढण्याची वेळच येत नाही. दिवाबत्तीच्या चांगल्या सोयी गल्लीबोळासह करण्यात आलेल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पालिका सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. खावली येथील विलगीकरण केंदामध्ये सर्व मूलभूत सेवा पालिकेमार्फत दिल्या जात आहेत. म्हणूनच पालिकेने वेगळे स्वत:चे विलगीकरण केंद्र सुरू केले नाही. तसेच कात्रेवाडा शाळा येथील विलगीकरण केंद्राला पालिकेने सर्व मूलभूत सुविधा पुरविल्या आहेत. कोरोना मृतांचे अंत्यसंस्कारदेखील पालिका स्वखर्चाने करीत आहे. लसीकरणासाठी लस उपलब्ध करून घेऊन कस्तुरबा प्राथमिक आरोग्य केंद्र, गोडोली आरोग्य केंद्र, शाहुपुरी ग्रामपंचायत इमारतीमधील लसीकरण केंद्र, शानभाग विद्यालय, श्रीपतराव पाटील हायस्कूल-करंजे, पिरवाडी, विलासपूर, विक्रांतनगर, चंदननगर, विशाल सह्याद्री शाळा शाहुनगर येथे लसीकरण केंद्र सुरू केली आहेत.
कोरोना प्रतिबंधासाठी पालिका विविध उपाय राबवित असल्यानेच पालिकेने स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू केला नाही. त्यामुळे पालिकेचे अस्तित्व दिसत नाही, अशी टीका करणे योग्य नाही. तरी सुध्दा केलेल्या टीकाचा सकारात्मकतेने विचार करून, पालिकेमार्फत आणखी काही उपाययोजना गतीने राबविण्याकरिता सातारा विकास आघाडी कटिबध्द आहे. घंटागाड्यांच्या गाण्यामुळे पालिकेचे अस्तित्व ज्यांनी मान्य केले, त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वच्छतेच्या बाबतीत नगरपरिषद सक्षमपणे काम करीत आहे अशी एकप्रकारे कबुलीच दिली आहे, असेच म्हणावे लागेल. कसेही असले तरी त्यांच्या टीकातून आदरपूर्वक चांगले काम करण्याचा प्रयत्न खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या माध्यमातून केला जाईल, असेही मनोज शेंडे यांनी नमूद केले आहे.