हाक ऐकताच जखमी अवस्थेतही तो थरारला!, उंब्रजमध्ये अनोखे श्वानप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:27 PM2019-04-01T15:27:04+5:302019-04-01T15:31:23+5:30

माणसा-माणसातील प्रेम, आपुलकी कमी होताना आपण पाहतो. मात्र, पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारेही आहेत, हे उंब्रजमधील एका घटनेच्या निमित्ताने पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्याला परगावी सोडून देण्यात आले. तेथे तो गंभीर जखमी झाला. अशा अवस्थेत त्याला माणुसकी जपणारा एक युवक भेटला. त्याने त्याच्यावर उपचार केले.

 He shouted while he was in a dead body; | हाक ऐकताच जखमी अवस्थेतही तो थरारला!, उंब्रजमध्ये अनोखे श्वानप्रेम

हाक ऐकताच जखमी अवस्थेतही तो थरारला!, उंब्रजमध्ये अनोखे श्वानप्रेम

Next
ठळक मुद्दे हाक ऐकताच जखमी अवस्थेतही तो थरारला!, उंब्रजमध्ये अनोखे श्वानप्रेमलाडक्या बंड्याच्या गळ्यात पडून मालकाने ढाळले अश्रू

उंब्रज : माणसा-माणसातील प्रेम, आपुलकी कमी होताना आपण पाहतो. मात्र, पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारेही आहेत, हे उंब्रजमधील एका घटनेच्या निमित्ताने पाहायला मिळाले.
रागाच्या भरात त्याला परगावी सोडून देण्यात आले. तेथे तो गंभीर जखमी झाला. अशा अवस्थेत त्याला माणुसकी जपणारा एक युवक भेटला. त्याने त्याच्यावर उपचार केले.

एक दिवस गेला. दुसरा दिवस गेला आणि घरातल्या लोकांचा राग शांत झाला. रागाच्या ठिकाणी त्याच्याविषयीचे प्रेम जागृत झाले. त्याला जेथे सोडले त्याठिकाणी त्याची शोधाशोध सुरू झाली. तोपर्यंत त्या युवकाने त्याचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला. त्यामुळे पत्ता समजला.

घरातील कर्ता माणूस त्याच्याकडे गेला आणि लांबून त्याने त्याला फक्त बंड्या अशी हाक मारली. बंड्याला धड उठताही येत नव्हते; पण हाक ऐकली की तो धडपडत उठला. कर्ता माणूस त्याच्याजवळ गेला आणि ढसाढसा रडू लागला. कोण होता तो, असा प्रश्न निर्माण झाला असेल ना? तर तो होता पाळीव श्वान आणि ढसाढसा रडणारा होता त्याचा मालक.

दोन दिवसांपूर्वी उंब्रज येथील सागर जाधव या युवकास लॅब्रेडोर जातीचा श्वान जखमी अवस्थेत येथील माणिक चौकात आढळला. त्याने आपल्या शेतातील शेडवर त्याला नेले. जखमी असल्यामुळे तो श्वान जाग्यावरच बसून होता. त्याला धड चालताही येत नव्हते. सागरने डॉक्टर बोलावून त्याच्यावर उपचार सुरू केले. श्वानाविषयी प्रेम असलेल्या सागरने त्या श्वानाचा फोटो आपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेट्सवर ठेवला.

याच दरम्यान सातारा येथील कारंडवाडी येथील संबंधित श्वानाचे मालक असलेले चंद्र्रकांत महाडिक उंब्रजमध्ये त्याचा शोध घेण्यासाठी आपल्या चिमुकल्या मुलासह स्वत:च्या रिक्षातून आले होते. ते गावात भेटेल त्याच्याकडे श्वानाविषयी चौकशी करत होते. असेच चौकशी करत ते युवराज जाधव यांना भेटले.

युवराजने सागरचा स्टेटस पाहिला होता. युवराजने सागरला फोन केला. त्याने श्वानाविषयीची माहिती महाडिक यांना विचारली. तेव्हा महाडिक एवढेच म्हणाले, मला फक्त तो श्वान दाखवा. मी हाक मारतो. तो आला तर तो माझा.

सागरने त्यांना शेतात बोलवले. शेडच्या बाहेर ते थांबले आणि त्यांनी त्याला फक्त बंड्या अशी हाक मारली. गंभीर जखमेमुळे संबंधित श्वानाला उठताही येत नव्हते; पण बंड्या अशी हाक ऐकताच तो जाग्यावरून उठला. महाडिक पळत आत गेले. त्यांनी त्याला जवळ घेतले आणि ढसाढसा रडू लागले. या घटनेवेळी उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाण्याने भरले. त्यानंतर जखमी अवस्थेतही ते श्वान उठले आणि रिक्षात जाऊन बसले.
 

काही दिवसांपूर्वी आमच्या रिक्षात शेजारचा मुलगा बसला म्हणून हे श्वान त्याला चावले. यावरून आमचा आणि त्या कुटुंबाचा वाद झाला. त्या रागाच्या भरात माझा भाऊ भोसलेवाडी येथील यात्रेला आला तेव्हा त्याने रिक्षातून त्याला आणले. फसवून त्याला तेथे सोडले; परंतु दोन दिवसांत सर्वांचा राग ओसरला. मुले रडू लागली. त्यांनी जेवण बंद केले. माझीही अवस्था तीच झाली. आज रिक्षा व्यवसाय बंद करून भोसलेवाडी व उंब्रज परिसरात गल्लीबोळात त्याला शोधण्यासाठी फिरलो; पण शेवटी तो सापडलाच.
- चंद्र्कांत महाडिक
कारंडवाडी, सातारा


मला जखमी अवस्थेत हे श्वान सापडले. माझ्या शेतातील शेडवर मी तीन श्वान पाळलेली आहेत. त्यात आणखी एक म्हणून सांभाळण्यास सुरुवात केली. ते जखमी असल्यामुळे मी डॉक्टरकडून त्याच्यावर उपचार केले. त्याचा फोटो स्टेट्सवर ठेवला. सोशल मीडियामुळे हे श्वान त्याच्या मूळ मालकाला पुन्हा मिळाले.
- सागर जाधव, उंब्रज

Web Title:  He shouted while he was in a dead body;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.