घरखर्चासाठी शक्कल, युट्यूब बघून बनावट नोटा ‘छापायला’ लागला; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 11:44 AM2024-01-09T11:44:05+5:302024-01-09T11:44:25+5:30
..अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला
सातारा : पैशासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही, असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला असून, एका तरुणाने घरखर्च भागविण्यासाठी चक्क बनावट नोटा तयार केल्या. तत्पूर्वी त्याने यू ट्यूबवर माहिती घेऊन हुबेहूब नोटाही बनवल्या. मात्र, मार्केटमध्ये या नोटा खपविण्याच्या प्रयत्नात असतानाच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
उमेश विठ्ठल वाडकर (वय २९, रा. भैरवनाथ सोसायटी, गडकरआळी, सातारा, मूळ रा. निझरे, ता. जावळी, जि. सातारा) या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडल्यानंतर त्याचे कारनामे तपासात समोर आले. उमेश वाडकर याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने साताऱ्यात कापड दुकान सुरू केले होते. मात्र, यात त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हाताला काम नाही. बाहेर मित्रांसोबत दिवसभर फिरत राहायचे, असा त्याचा दिनक्रम असायचा.
एके दिवशी त्याने यू ट्यूबवर बनावट नोटा कशा तयार केल्या जातात, याचा व्हिडीओ पाहिला. आपणही अशा नोटा बनवून त्या मार्केटमध्ये खपवू शकतो, याचा त्याला आत्मविश्वास आला. पण, या नोटा तयार कुठे करायच्या, असा प्रश्न त्याला पडला. त्याच्या मित्राने साताऱ्यात नवीनच लाॅज, हाॅटेल सुरू केले होते. त्या लाॅजवर जाऊन मित्राला न सांगता आपण बनावट नोटा तयार करू, असे ठरवून तो त्याच्याकडे रोज जायचा.
त्या लाॅजमध्ये प्रिंटर आणि संगणक होता. या संगणकावर तो तासनतास बसायचा. मित्राला वाटायचे, त्याचे ऑनलाइन काम करतोय. पण, त्याचे भलतेच काम सुरू असायचे. एक - एक करत त्याने दोनशे रुपयांच्या हुबेहूब ९५ नोटा तयार केल्या. या बनावट पैशातून त्याने घरखर्च भागविण्याचा डाव रचला. त्याने काही नोटा पानटपरी, किराणा माल, भाजीपाला अशा ठिकाणी दिल्या असण्याची शक्यता आहे. या नोटा परत घेण्यासाठी त्याच्याकडे पोलिस कसून चाैकशी करत आहेत.
साताऱ्यातील विक्रेते चिंतेत..
उमेश वाडकर याने पानटपरी, भाजीविक्रेते, किराणा माल या ठिकाणी या बनावट नोटा खपविल्या असल्याची शक्यता आहे. दोन ते चार रुपये प्रत्येक वस्तूमागे या व्यावसायिकांना कमिशन मिळत असते. परंतु, या बनावट नोटांमुळे दिवसभरात कमावलेली कमाई त्यांची पाण्यात जाऊ शकते. साताऱ्यातील काही विक्रेते आपल्याजवळ असलेल्या नोटा खऱ्या आहेत का, हे तपासून पाहू लागले आहेत.