आलिशान गाडीतून आले, दुकानातील रोकड घेऊन पसार झाले; देगाव फाट्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:03 PM2022-05-03T16:03:15+5:302022-05-03T16:03:59+5:30
‘सुटे पैसे आहेत का,’ अशी विचारणा त्यांनी दुकानात असलेल्या अकाउंटंट ज्योती पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांना बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ड्राॅव्हरमध्ये पुरुषाने हातचलाखी करून ७० हजारांची रोकड काढून घेतली
सातारा : आलिशान गाडीतून येऊन पुरुष व महिलेने एका दुकानातून शिरून तेथील अकाउंटंटला बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ७० हजारांची रोकड हातोहात लांबविली. ही घटना देगाव फाट्यावरील एका दुकानात काल, सोमवारी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, योगेश नानशंद ओसवाल (वय २८) यांचे देगाव फाट्यावर धनराज स्टील या नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये सोमवारी दुपारी अकाउंटंट ज्योती पवार या एकट्याच होत्या. त्यावेळी एका आलिशान कारमधून एक महिला आणि पुरुष त्यांच्या दुकानात आले. ‘सुटे पैसे आहेत का,’ अशी विचारणा त्यांनी दुकानात असलेल्या अकाउंटंट ज्योती पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांना बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ड्राॅव्हरमध्ये पुरुषाने हातचलाखी करून ७० हजारांची रोकड काढून घेतली. त्यानंतर काही वेळात दोघेही तेथून निघून गेले.
तासाभरानंतर ओसवाल हे दुकानात परत आले असता त्यांना ड्रॉव्हरमधील रोकड कमी असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता एक महिला व एक पुरुष ही रोकड चोरत असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलीसही अवाक्
संबंधित महिला व पुरुषाने आलिशान गाडीतून येऊन त्यांनी चोरी केल्याने पोलीसही अवाक् झाले आहेत. इतकी महागडी कार वापरणारा चोरटा कसा असू शकतो, असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.