आघाडीची शिष्टाई संपली; आता अस्तित्वाची लढाई!
By admin | Published: July 25, 2016 10:40 PM2016-07-25T22:40:01+5:302016-07-25T23:42:40+5:30
सातारा-सांगली विधान परिषद : काँगे्रस-राष्ट्रवादीचा द्वंद्व; प्रभाकर घार्गे यांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार
सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक संस्था मतदार संघात काँगे्रस लढणार असल्याची घोषणा केली आहे. काँगे्रसने आघाडीची शिष्टाई पाळत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रवादीचे आमदार प्रभाकर घार्गे यांचा कार्यकाळ संपणार असल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला रान मोकळे न सोडता काँगे्रस अस्तित्वाची लढाई लढणार आहे.
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघाची निवडणूक नोव्हेंबर २०१० मध्ये झाली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे, सांगलीतील राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते नाना महाडिक, साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक निशांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
काँगे्रसच्या अंकुश गोरेंशी आ. घार्गेंचा सामना होणार अशी परिस्थिती असतानाच आ. चव्हाण यांनी आघाडीची शिष्टाई पाळत अंकुश गोरे यांचा उमेदवारी अर्ज काढला होता. सहा वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर या मतदार संघाची निवडणूक लागली होती. काँगे्रस श्रेष्ठींनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून राज्यात आणले. आ. अशोक चव्हाण यांच्या गच्छंतीनंतर पृथ्वीराजबाबांकडे राज्याचे नेतृत्व देण्यात आले होते. काँगे्रसची त्यावेळी राष्ट्रवादीसोबत आघाडी होती.
याचदरम्यान विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली. पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडीधर्म पाळला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या इतर दोन उमेदवारांनीही अर्ज काढून घेतल्याने आमदार प्रभाकर घार्गे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले.
दरम्यान, सातारा-सांगली या दोन जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा मतदारसंघ असला तरी साताऱ्याचे मतदान सांगलीच्या तुलनेत जास्त आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आ. घार्गेंच्या रूपाने आणखी एक आमदारकी राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली होती.
आता चित्र बदललेले आहे. आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यातील काँगे्रसला नेस्तनाबूत करण्याचा सपाटा लावल्याचा आरोप काँगे्रसजणांकडून वारंवार होत आहे. जिल्हा काँगे्रस कमिटीत नुकत्याच झालेल्या काँगे्रस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी राष्ट्रवादीला कुठल्याही परिस्थितीत मदत करायची नाही, असा आग्रह पृथ्वीराजबाबांकडे धरला होता.
काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांनी तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती केली तर मी त्या युतीत नसेन, असे ठणकावून सांगितले होते. काँगे्रसजणांची ही आक्रमकता लक्षात घेऊन सातारा-सांगली विधान परिषद काँगे्रसच्या झेंड्याखाली लढण्याचा निर्धार पृथ्वीराजबाबांनी बोलून दाखविला. ही निवडणूक जिंकून त्यानंतर होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनाही ताकदीने सामोरे जाण्याचा निर्धार केला.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पक्षांत काट्याची टक्कर पाहायला मिळते. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरीही प्रत्येक ठिकाणी काँगे्रसचे बळ धक्का देण्याइतपत चांगले आहे. या बळाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला जेरीस आणण्याचे धोरण काँगे्रसने आखल्याचे सध्या तरी पाहायला मिळते. विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँगे्रस श्रेष्ठींनी राष्ट्रवादीला एक जागा जादा दिली होती. तेच धोरण आगामी काळातही राहिल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील काँगे्रसजण काय भूमिका घेतात, हे पाहण्याजोगे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
कोण आहेत मतदार?
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील २३३ तर सातारा जिल्ह्यातील २७२ अशा एकूण ५0५ मतदारांची मागील निवडणुकीत नोंद होती. यात ज्या नवनिर्मिती नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यांच्या सदस्यांचीही भर पडणार आहे. दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा, नगरपालिका, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांचे सर्व सदस्य तसेच दोन्ही जिल्ह्यांतील २२ पंचायत समित्यांच्या सभापतींना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. साहजिकच काँगे्रस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुकीत आपली ताकद आजमावणार आहेत.