मे महिन्याच्या तुलनेत जून बरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:39+5:302021-07-03T04:24:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचा महाविस्फोट सुरू असताना, मे महिन्यातच तब्बल ६१ हजार बाधित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचा महाविस्फोट सुरू असताना, मे महिन्यातच तब्बल ६१ हजार बाधित आढळले होते, तर १,१४७ जणांचा मृत्यू झालेला, पण जून महिना दिलासादायक ठरला. जूनमध्ये २५ हजार नवीन रुग्ण स्पष्ट झाले, तर ६८८ जणांचा मृत्यू झाला, तसेच ३२ हजार नागरिकांनी कोरोनावर मात केली. यामुळे प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला.
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीला कोरोनाबाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २० तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या वर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली. त्यामुळे सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला होता, तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली. असे असले, तरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले. जानेवारीपर्यंत स्थिती चांगली होती. मात्र, फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली.
या वर्षी एप्रिल या एकाच महिन्यात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक रुग्ण सापडले. ३७ हजार २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर मे महिन्यात एप्रिलचा रेकॉर्ड मोडत तब्बल ६०,९०६ बाधित सापडले. हा आकडा सुरुवातीच्या एक वर्षातील ठरला. कारण गेल्या वर्षी २३ मार्चला जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला, तर या वर्षीच्या १६ मार्चपर्यंत ऐकूण ६१,०२७ रुग्ण झाले होते. एक वर्षातील हा आकडा एका मे महिन्यातच गाठला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना विस्फोटाची स्थिती लक्षात येते, तर जून महिन्यात २५,५७५ रुग्ण नवीन समोर आले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८८ हजार २९८ रुग्ण स्पष्ट झाले आहेत, तर ४,४०९ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांपैकी ६८८ बळी हे जून महिन्यातील आहेत, तर या एकाच महिन्यात तब्बल ३२,६५५ बरे झाले आहेत.
चौकट :
जानेवारी ते मेपर्यंतची कोरोना आकडेवारी...
- या वर्षी जानेवारी महिन्यात डिसेंबरच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण निम्म्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे असले, तरी कोरोनामुक्त ९७९ जण झाले होते.
- फेब्रुवारी महिन्यात २ हजार ४९१ नवीन रुग्ण स्पष्ट झाले. जानेवारीचा विचार करता, जवळपास १,१०० नवीन रुग्णांची भर पडली, तर ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे फेब्रुवारीत मृतांचा आकडाही १० ने वाढल्याचे दिसून आले, तर १ हजार ८५५ जण बरे झाले.
- मार्च महिन्यात कोरोनाचे नवीन ६ हजार ५४८ रुग्ण आढळले. फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजार ४९० बाधित वाढले, तर ५१ जणांचा मृत्यू झाला. मागील महिन्यापेक्षा १५ ने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली, तर १ हजार २२३ जण कोरोनामुक्त झाले होते.
- एप्रिल महिन्यात ३७,२१८ नवीन रुग्ण स्पष्ट झाले, तर ५८० जणांचा मृत्यू झाला. २२ हजार नागरिकांनी कोरोनावर मात केली. एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या मार्चपासून सप्टेंबरपर्यंत ३७ हजार रुग्ण सापडले होते. सुरुवातीच्या सात महिन्यातील रुग्णसंख्या एप्रिल या एका महिन्यातच सापडले होते.
- मे महिन्यात तब्बल ६०,९०६ रुग्ण आढळून आले, तर १,१४७ बाधितांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर, ५७,३५१ जणांनी कोरोनावर मात केली होती.
.................................................................