कापशीत महिलादिनी आरोग्याचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:05+5:302021-03-09T04:43:05+5:30
आदर्की : फलटण तालुक्यातील कापशी या गावात सोमवारी महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महिलांचे आरोग्य अबाधित राहावे ...
आदर्की : फलटण तालुक्यातील कापशी या गावात सोमवारी महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महिलांचे आरोग्य अबाधित राहावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अंगणवाडी कार्यालयात सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात आले. या आरोग्यपूर्ण उपक्रमाचे महिलांमधून कौतुक करण्यात आले.
कापशी ग्रामपंचायत, हिरकणी प्रतिष्ठान पुणे, यशवंतराव चव्हाण सामजिक महाविद्यालय, सातारा व सुनीता फाउंडेशन कापशी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. यानंतर सरपंच संजय गार्डे यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकीन मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
कापशी गावात पार पडलेला हा उपक्रम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा गावातील महिलांना नक्कीच लाभ होईल. परिसरातील इतर गावांनीदेखील असा उपक्रम राबविल्यास खऱ्या अर्थाने महिलांचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात उपसरपंच पूनम राशीनकर, ग्रामपंचायत सदस्या गौरी जाधव, मैना काकडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कदम, सागर कदम, उदंम महिला उद्योग समूहाच्या सोनाली शेंडगे यांच्यासह जिजाऊ व रमाई बचत गटाच्या महिला सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणी प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, छत्रपती अकॅडमी कापशी, ग्रामपंचायत कापशी यांनी विशेष सहकार्य केले. सुनीता फाउंडेशनचे सुशील काकडे यांनी आभार मानले.
(कोट)
ग्रामीण भागातील महिलांमध्ये आजही आरोग्याच्या बाबतीत म्हणावी इतकी सजगता नाही. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी गावात सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात आली. महिलांमध्ये हळूहळू का होईना जनजागृती होईल.
- संजय गार्डे, सरपंच
(कोट)
मुली, महिलांना उत्तम आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करतानाच सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात आली. या आरोग्यपूर्ण उपक्रमाचा महिलांना नक्कीच लाभ होईल.
- पूनम राशीनकर, उपसरपंच
फोटो : ०८ कापशी
कापशी (ता. फलटण) येथे सोमवारी महिला दिनानिनिमित्त अंगणवाडी कार्यालयात सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात आली.