विठामाता विद्यालयात आरोग्य शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:12 AM2021-02-18T05:12:45+5:302021-02-18T05:12:45+5:30
कऱ्हाड : येथील पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरातील विठामाता विद्यालयात मुलींसाठी आरोग्य शिबिर व त्यावरील काळजी ...
कऱ्हाड : येथील पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरातील विठामाता विद्यालयात मुलींसाठी आरोग्य शिबिर व त्यावरील काळजी विषयक परिसंवाद झाला. मुलींना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, व्यवस्थापक तथा तांत्रिक तज्ज्ञ गीतांजली यादव, व्यवस्थापक तथा समुपदेशक दीपाली रेपाळ आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप झाले.
कऱ्हाड पालिकेतर्फे झोपडपट्टीत जागृती
कऱ्हाड : येथील पालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत टिळक हायस्कूल परिसरातील झोपडपट्टीमध्ये पर्यावरण विषयक जागृती करण्यात आली. यावेळी भूमी, जल प्रदूषण यासह प्लास्टिक बंदीची माहिती देण्यात आली. पाणी वाचवा, वीज बचत व कापडी पिशवी वापर याबाबतची माहिती यावेळी उपस्थित नागरिकांना देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत येणारे सात प्रश्न काय असतील, याचीही जागृती यावेळी करण्यात आली.
कालवडेत महिलांना अवजारांचे प्रात्यक्षिक
कऱ्हाड : कालवडे, ता. कऱ्हाड येथे कल्याणी गोरक्षण ट्रस्ट संचलित भारतीय कृषी अनुसंधान परिषद व कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने महिलांना शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी तसेच रोप लागण यंत्र, खते देण्याची पिशवी, धान्य स्वच्छ करण्याचे यंत्र या अवजारांचे प्रात्यक्षिक देण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. भरत खांडेकर यांच्या हस्ते प्रात्यक्षिकाचा प्रारंभ झाला. विशेषज्ञ विशाल महाजन यांनी प्रात्यक्षिकाची संकल्पना व महत्त्व सांगितले. प्रियदर्शनी देशमुख यांनी प्रात्यक्षिकाची गरज, पद्धत व तंत्रज्ञान याविषयी प्रशिक्षण दिले. प्रात्यक्षिकांमध्ये कालवडे गावातील बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. विज्ञान केंद्रातील अधिकारी निलेश थोरात, पवन जोशी, प्रकाश थोरात व कर्मचारी उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याची मागणी
कऱ्हाड : येथील बसस्थानकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा यापूर्वी होत्या. मात्र बसस्थानकाच्या नूतनीकरणानंतर या प्रतिमा काढण्यात आल्या. तरी या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा बसस्थानकात प्रथमदर्शनी लावाव्यात, अशी मागणी भीम आर्मी या सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कऱ्हाड आगार व्यवस्थापक यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी, जिल्हाध्यक्ष संतोष थोरावडे, पाटण तालुका संघटक फिरोज मुल्ला उपस्थित होते.
कऱ्हाडात सरोजिनी नायडू यांना अभिवादन
कऱ्हाड : येथील विठामाता विद्यालयात स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन ‘इंग्लिश डे’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तीपत्रकाचे प्रकाशन झाले. मुख्याध्यापिका व्ही. एस. पवार, योगिता सदावर, एस. आर. डुबल उपस्थित होते. एम. पी. कदम यांनी विठाई अंकाचे प्रकाशन केले. नयना चव्हाण यांनी स्वागत केले. समीक्षा गायकवाड, साक्षी शिंगण यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मांडले. दिया भागवत हिने आभार मानले. वैशाली सूर्यवंशी यांनी नियोजन केले.