पावसाळ्यामुळे आरोग्य विभाग सज्ज; नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सूचना
By नितीन काळेल | Published: June 27, 2023 07:09 PM2023-06-27T19:09:46+5:302023-06-27T19:10:37+5:30
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सूचना करण्यात आली असून अतिवृष्टीच्या तालुक्यात पुरेसा औषध साठा ठेवण्यात आला आहे.
सातारा : जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेचाआरोग्य विभाग दक्ष झाला आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तो २४ तास कार्यरत राहणार आहे. या माध्यमातून आपत्तीतील लोकांना मदत देण्यात येणार आहे. तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सूचना करण्यात आली असून अतिवृष्टीच्या तालुक्यात पुरेसा औषध साठा ठेवण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याचा आढावा घेण्यात येतो. या अंतर्गत आरोग्य केंद्रांना पावसाळ्याच्या काळात दक्ष राहण्याची सूचना केली जाते. यावर्षीही याबाबत बैठक झाली. तर सध्याच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. पावसाळ्यात जलजन्य, किटकजन्य आदी आजारांची साथ परसण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्यरत उपकेंद्राकडील आरोग्य कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योग्य ते नियोजन करण्याबाबत सूचना केली आहे. तसेच गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या योजनांचे सर्व्हेक्षण करुन गळती असल्यास ग्रामपंचायतीस पत्र देऊन त्या बंद करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच डेंग्यु, चिकणगुन्याबाबतचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आलेली आहेत.
सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी होणाऱ्या जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अतिआवश्यक असणारी औषधे यामध्ये श्वान, सर्पदंशावरील देण्यात आली आहे. तसेच जुलाब, पॅरासिटामोल अशी औषधे पुरविण्यात आली आहेत. याबरोबरच दुर्गम भागात प्रसुती होणाऱ्या गरोदर मातांना सुरक्षीत ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सर्व रुग्णवाहिकाही सुस्थितीत ठेवण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे. जावली, महाबळेश्वर, पाटण व वाई तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते. यासाठी या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा आषैधसाठा देण्यात आला आहे. ग्रामीण भागात आशा सेविकांद्वारे किरकोळ आजरावरील औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. लोकांची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
- डॉ प्रमोद शिर्के, जिल्हा आरोग्य अधिकारी
पावसाळ्यात आजारी पडण्याचा धोका असतो. त्यामुळे जिल्ह्यातील आणि विशेषत: करुन दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मोठ्या प्रमाणात औषधसाठ्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनाही अतिवृष्टीच्या काळात मुख्यालयी राहून आरोग्य सेवा पुरविण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे.
- ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी