Satara News: पावसाळ्यामुळे आरोग्य विभाग सज्ज; नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत
By नितीन काळेल | Published: June 27, 2023 07:09 PM2023-06-27T19:09:15+5:302023-06-27T19:29:17+5:30
कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सूचना: अतिवृष्टीच्या तालुक्यात मोठा औषध साठा
सातारा : जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेचा कृषी विभाग दक्ष झाला आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तो २४ तास कार्यरत राहणार आहे. या माध्यमातून आपत्तीतील लोकांना मदत देण्यात येणार आहे. तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सूचना करण्यात आली असून अतिवृष्टीच्या तालुक्यात पुरेसा आैषध साठा ठेवण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याचा आढावा घेण्यात येतो. या अंतर्गत आरोग्य केंद्रांना पावसाळ्याच्या काळात दक्ष राहण्याची सूचना केली जाते. यावर्षीही याबाबत बैठक झाली. तर सध्याच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. पावसाळ्यात जलजन्य, किटकजन्य आदी आजारांची साथ परसण्याची शक्यता असते.
यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्यरत उपकेंद्राकडील आरोग्य कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योग्य ते नियोजन करण्याबाबत सूचना केली आहे. तसेच डेंग्यु, चिकणगुन्याबाबतचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आलेली आहेत.