कोरोनाला हरविण्यासाठी आरोग्य सुविधा गरजेच्या : शिवेंद्रराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:04+5:302021-07-26T04:35:04+5:30
परळी : ‘कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. कोरोना रोखणे ही काळाची गरज असून, त्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत. ...
परळी : ‘कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. कोरोना रोखणे ही काळाची गरज असून, त्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत. कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे,’ असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेमार्फत सातारा तालुक्यातील लिंब, कण्हेर, ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सुविधांनीयुक्त नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. सातारा पंचायत समितीच्या आवारात या तीनही रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वनिता गोरे, मधू कांबळे, कमल जाधव, प्रतीक कदम, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, छाया कुंभार, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. स्वप्नील धर्माधिकारी, डॉ. मानसी पाटील, डॉ. अरुण पाटोळे उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, ‘शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सातारा तालुक्यातील लिंब, कण्हेर आणि ठोसेघर याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्या-त्या भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी या केंद्रांवर येत असतात. ठोसेघर हा दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने तसेच लिंब आणि कण्हेर आरोग्य केंद्रांच्या अखत्यारित आसपासची अनेक गावे येत असल्याने रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त रुग्णवाहिका या तीनही आरोग्य केंद्रांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा लाभ रुग्णांना होईल.’
चौकट
आवश्यक तेवढा लस साठा उपलब्ध करा
कोरोनावरील लसींचा साठा कमी पडत असून, प्रत्येक लसीकरण केंद्रावर आवश्यक असेल तेवढा लस साठा सातत्याने पुरवला पाहिजे. यासंदर्भात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी बोललो आहे. लस उपलब्धता आणि लसीकरण गतीने होण्यासंदर्भात चर्चाही केली आहे.