नागेवाडी धरणाजवळ मृत कोंबड्या टाकल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:11 AM2021-03-13T05:11:27+5:302021-03-13T05:11:27+5:30
वाई : नागेवाडी धरणाच्या सांडव्याजवळ परिसरातील पोल्ट्रीमध्ये मृत पावलेल्या कोंबड्या टाकल्याने खळबळ उडाली आहे. बावधनसह नागेवाडी, कनूर, दरेवाडी परिसरातील ...
वाई : नागेवाडी धरणाच्या सांडव्याजवळ परिसरातील पोल्ट्रीमध्ये मृत पावलेल्या कोंबड्या टाकल्याने खळबळ उडाली आहे. बावधनसह नागेवाडी, कनूर, दरेवाडी परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, कनूर परिसरात पोल्ट्री असून त्या पोल्ट्रीतील या मृत कोंबड्या असल्याची चर्चा सुरू आहे. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मृत कोंबड्यांना कोणत्या प्रकारचा आजार झालेला होता, कशामुळे त्या दगावल्या आहेत हे समजत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नागेवाडी धरणाच्या सांडव्याजवळून बावधनसह बारा वाड्यांना पिण्याचे व शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. सांडव्याजवळच मृत कोंबड्या टाकल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
या प्रकारापासून पशुवैद्यकीय खाते अनभिज्ञ असून, नागेवाडी पाटबंधारे खात्याने तरी गांभीर्याने घेऊन संबंधित मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच मृत कोंबड्या पूर्णपणे सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. होणाऱ्या संसर्गापासून लोकांची सुटका करावी अन्यथा मृत कोंबड्यांमुळे होणाऱ्या रोगाचा फैलाव आटोक्यात आणणे संबंधित विभागाला अवघड होणार आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात ब्लर्ड फ्लूने कोंबड्या मृत पावल्याच्या घटना घडल्या असून संबंधित वैद्यकीय विभागाने अतिशय नियोजन पद्धतीने मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावलेली आहे. त्यामुळे साथ आटोक्यात आणण्यात यश आलेले आहे. नागेवाडी धरण परिसरातील पोल्ट्री फोर्म व्यावसायिकाने सामाजिक बांधीलकी म्हणून याबाबी हाताळण्याची जबाबदारी असताना, बेफिकीरपणे धरणाच्या सांडव्याजवळ पिण्याच्या पाण्याचा वापर होत असणाऱ्या ठिकाणी मृत कोंबड्या टाकून परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, तरी संबंधितावर कडक कारवाई करून या परिसरात असणारी पोल्ट्री कायमची बंद करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरत आहे. पशुवैद्यकीय विभागाने संबंधितांवर त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.