कठापूरच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:06+5:302021-05-28T04:28:06+5:30
कोरेगाव : कठापूर, ता. कोरेगाव येथील कृष्णा नदीकाठी आले धुण्यासाठी दररोज सायंकाळी मोठी यात्रा भरत असून, जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीचे ...
कोरेगाव : कठापूर, ता. कोरेगाव येथील कृष्णा नदीकाठी आले धुण्यासाठी दररोज सायंकाळी मोठी यात्रा भरत असून, जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीचे अक्षरश: उल्लंघन होत आहे. ग्रामस्थांनी तक्रार करून देखील ग्रामपंचायतीपासून प्रशासन आणि पोलीस दल दुर्लक्ष करत आहे. आले धुणाऱ्या कामगारांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे.
कठापूरमध्ये पुलानजीक पाणवठा व दहावा करण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून नागठाणे, पाल-खंडोबाची, आर्वी, रहिमतपूर, कोरेगाव, पुसेगाव यासह सातारा, कोरेगाव व खटाव तालुक्यांतील अनेक आले व्यापारी आपल्या कामगारांसह दररोज सायंकाळी आले धुण्यासाठी गर्दी करत आहेत. अक्षरश: नदी काठाला यात्रेचे स्वरूप येत आहे.
यासंदर्भात युवक कार्यकर्ते चंद्रकांत यादव व अमित केंजळे यांनी ग्रामपंचायत, रहिमतपूर पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आदी ठिकाणी लेखी तक्रारी एप्रिल महिन्यात दिल्या आहेत, त्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई अद्याप केली गेली नाही. ग्रामपंचायतीने उलट टपाली पत्र दिले असून, त्यामध्ये आमच्या अधिकार क्षेत्रात ही बाब येत नसल्याचे म्हटले आहे.
एकूणच राजकीय दबाब आणि नातेसंबंधांच्या दडपणाखाली या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कठापूरमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढण्यास ही वाढती गर्दी कारणीभूत असून, या विषयी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास, तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील या युवकांनी दिला आहे.
चौकट :
पाणी योजना धोक्यात...
कृष्णा नदीवर अनेक गावच्या पाणी योजना कार्यान्वित आहेत. केवळ कठापूरच नव्हे तर कोरेगाव, धामणेर, जिहे, ब्रह्मपुरी, रहिमतपूरच्या पाणी योजनांसाठी आले धुणे हे धोकादायक ठरत आहे. आल्याबरोबरच माती मोठ्या प्रमाणावर नदीत साचत आहे. त्यामुळे या पाणी योजना धोक्यात येऊ शकतात, अशी भीती देखील चंद्रकांत यादव व अमित केंजळे यांनी व्यक्त केली.
फोटोनेम :
२७कोरेगाव फोटो ओळ : कठापूर, ता. कोरेगाव येथे कृष्णा नदीकाठी आले धुण्यासाठी कामगार आणि वाहने आलेले आहेत.