भुईंज आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:33+5:302021-05-15T04:37:33+5:30
पाचवड : भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करावे. तसेच वाईला उपजिल्हा रुग्णालय तसेच कवठे येथील कोरोना ...
पाचवड : भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करावे. तसेच वाईला उपजिल्हा रुग्णालय तसेच कवठे येथील कोरोना सेंटरमध्ये व्हेंटिलेटर अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तत्त्वतः मंजुरी दिली आहे,’ अशी माहिती ईशान भोसले यांनी दिली.
वाई तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढती असून वाई शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागमधील जनता आरोग्य सेवा व उपचारासाठी हतबल होत आहे. या पार्श्वभूमीवर ईशान भोसले यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन वाई तालुक्यातील आरोग्य सेवा व सुविधांबाबत चर्चा करून वाई येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करणे, कवठे येथिल कोविड उपचार केंद्रात व्हेंटिलेटर व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करणे तसेच कोरोनासाठी भरलेला कर्मचारी वर्ग, वैद्यकीय अधिकारी यांना पूर्ण वेळ सेवेत सामावून घेण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात आले. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी देत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले असल्याची माहितीही ईशान भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
चौकट :
भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यासाठी माजी आमदार मदन भोसले यांनी पंधरा वर्षांपूर्वी मंजूर करून ते सुरू करावे यासाठी प्रयत्न केले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे ते प्रलंबित आहे. महामार्गावर होणारी अपघात संख्या विचारात घेऊन अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करा, जादा डॉक्टर्स या ठिकाणी घ्या अशा अनेक मागण्या वेळोवेळी करूनही संबधीत यावर कोणतीही दखल घेत नाहीत. यामुळे आता तरी कोरोनासारखी जीवघेणी महामारी रोखण्यासाठी हे ग्रामीण रुग्णालय सुरू होणार का याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.