कोरोनाची लाट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:02+5:302021-02-23T04:57:02+5:30
सातारा : जिल्ह्यात गत १० दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा एकवटली आहे. जिल्ह्यातील ३१ रुग्णालयांमध्ये रुग्णांवर ...
सातारा : जिल्ह्यात गत १० दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा एकवटली आहे. जिल्ह्यातील ३१ रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केले जाणार असून, सर्वाधिक जम्बो हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात १० दिवसांत ७०० नवे रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाची धडधड वाढली आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने अगोदरच तयारी केली आहे. अचानक रुग्ण वाढले तर गत वर्षी झालेली तारांबळ यावर्षी होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने प्रत्येकाला आपापली जबाबदारी विभागून दिली आहे. साता-यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून उपचाराला प्राधान्य दिले जात आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय आणि क-हाड येथील कृष्णा रुग्णालय या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर असेल, अशा रुग्णांवर कोविड रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत. तर ब-यापैकी ज्या रुग्णांची प्रकृती असेल, त्या रुग्णांवर हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.
पूर्वी जी कोरोना सेंटर बंद करण्यात आली होती, ती सध्याच्या स्थितीला बंदच ठेवण्यात येणार आहेत. गरज भासली तरच ही सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड कमी पडू नयेत म्हणून यंदा खबरदारी घेण्यात आली आहेत. हा संपूर्ण साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
चौकट : कोविड हॉस्पिटल-१४
हेल्थ केअर सेंटर-१७
व्हेंटिलेटर- ३४७८
कर्मचारी-४२६०
......................
चौकट : जम्बो हॉस्पिटलची यंत्रणा
बेडची क्षमता- २८८
आयसीयू- ७०
व्हेंटिलेटर-७०
ऑक्सिजन-२१८
कर्मचारी-२७८
सध्या कोरोना रुग्ण- १३२
........................................
चौकट : सिव्हिल हॉस्पिटलमधील स्थिती..
व्हेंटिलेटर-१४
बेड- २६७
कर्मचारी-७३
........................................
चौकट : वर्षभरात तीन लाख जणांचे स्वॅब
जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ३७ हजार ५९ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यामध्ये दोन लाख ७५ हजार २६९ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. तर, ५७ हजार ९३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एक हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५५ हजार ९७ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या ९९२ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
........................................
चौकट : ग्रामीण भागही सज्ज
जिल्ह्यातील फलटण, वाई, खंडाळा, गोंदवले, क-हाड या ठिकाणीही हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत. एखादा रुग्णाची प्रकृती खालावली तर त्याला १४ पैकी कुठल्याही कोविड रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाची संख्या अत्यंत कमी आहे. परंतु, बेसावध न राहता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये हे रोजच्या रोज आढावा घेऊन कर्मचा-यांना सूचना करत आहेत.
...........................
चौकट : काय काळजी घ्याल...
घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा
सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर कोणत्याही वस्तूला हात लावू नये
मास्क रोजच्या रोज बदलावा
घरात गेल्यानंतर सॅनिटायझर अथवा साबणाने हात स्वच्छ धुवावे.
शिंका, ताप, सर्दी अशी लक्षणे आढळल्यास रुग्णालयात जावे
इतरांशी बोलताना १० फुटांचे अंतर ठेवावे
..........................................................................
कोट : नागरिकांनी कोरोना संपला, असे समजू नये. आपली दैनंदिन कामे करताना मास्क गरजेचाच आहे. आपण आपली काळजी घेतली तर कोरोना आपल्यापासून कोसो दूर राहील.
डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
.........................................
फोटो : २१ जम्बो हॉस्पीटल, सातारा
फोटो ओळ : साता-यातील जम्बो हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्ड अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झाला असून, या वॉर्डमध्ये रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जात आहेत.
.......................
फोटो : २१ जम्बो हॉस्पीटल०२
जम्बो हॉस्पीटलमधील आॅक्सिजन वॉर्डमध्ये सध्या कमी रुग्ण असून, या ठिकाणीही रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहे.