सुमारे ९० भारतीय अजून चीनमध्येच; भारतीयांच्या आरोग्य चाचण्या अजूनही प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:11 AM2020-02-22T01:11:21+5:302020-02-22T01:13:59+5:30
चीनमधील वुहान आणि इतर शहरांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांचा मायदेशात येण्याचा मार्ग अजूनही सुकर झालेला नाही. वुहानमधून ३६ भारतीय गुरुवारी देशात आले; पण अजूनही जवळपास ९० भारतीय चीनमध्येच अडकून पडलेले आहेत.
सातारा : कोरोना रोगाच्या संसर्गामुळे चीनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; पण तिथून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्य तपासणी चाचण्या न झाल्यामुळे अजूनही ९० भारतीय चीनमध्येच अडकून पडले आहेत. या चाचण्या कधी होणार? याबाबत अजूनही काहीच माहिती भारतीय नागरिकांना देण्यात आलेली नाही.
चीनमधील वुहान आणि इतर शहरांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांचा मायदेशात येण्याचा मार्ग अजूनही सुकर झालेला नाही. वुहानमधून ३६ भारतीय गुरुवारी देशात आले; पण अजूनही जवळपास ९० भारतीय चीनमध्येच अडकून पडलेले आहेत. त्यांना भारतात येण्यासाठी सर्व आरोग्य तपासण्या कराव्या लागणार आहेत. जे भारतीय परतले, त्यांची आरोग्य तपासणी १ फेब्रुवारीला झाली होती. त्यामुळे ते भारतात येऊ शकले.
उर्वरित लोकांची आरोग्य तपासणी अजूनही झालेली नाही, त्यामुळे त्यांना भारतात येण्यास उशीर होत आहे.
अश्विनी पाटील यांच्याकडे अजून तीन दिवस पुरेल एवढा धान्यसाठा आहे. त्यानंतर त्यांना चीनमधील भारतीय दूतावासाकडून अन्नधान्य मागवून घ्यावे लागणार आहे. तोपर्यंत अन्नधान्य पुरेल अशी शक्यता आहे. मात्र, अजून तपासण्या कधी होणार? याबाबत काहीच निश्चितता नसल्यामुळे सर्व गोष्टी प्रलंबित आहेत. कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
एखाद्या ठिकाणी साथीच्या आजारांची परिस्थिती असेल तर त्याठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी सर्व प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात. त्या तपासण्या अजून झालेल्या नाहीत. कधी होणार, याबाबत कळविलेले नाही. त्या तपासण्यानंतरच आम्हाला भारतात येता येईल.
- अश्विनी पाटील, चीनमधील वुहानमध्ये अडकलेली सातारकर