करवडीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:33+5:302021-02-11T04:40:33+5:30
याबाबतचे निवेदन मनोज माळी, सचिन पिसाळ, रोहित आगेडकर, जयदीप आचार्य, अनिकेत हजारे, राजेंद्र पवार, दादासाहेब कावरे, वैभव काशीद यांनी ...
याबाबतचे निवेदन मनोज माळी, सचिन पिसाळ, रोहित आगेडकर, जयदीप आचार्य, अनिकेत हजारे, राजेंद्र पवार, दादासाहेब कावरे, वैभव काशीद यांनी प्रशासनाला दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करवडी येथील बालाजी वॉर्डमध्ये सप्तश्रुंगी माता मंदिराजवळ शौचालय व जनावरांच्या शेडमधील सांडपाणी उघड्यावरून वाहात असून, मोकळ्या जागेत खड्डा करून त्यामध्ये पाणी सोडले आहे. हा खड्डा पूर्ण भरला असून, डासांची उत्पत्ती होत आहे. परिणामी, परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर विस्तार अधिकारी व प्रशासक यांनी त्याठिकाणी भेट देऊन केवळ उघड्यावरील वाहाते गटर बंद करून सर्व सांडपाणी पाईपद्वारे त्या खड्ड्यात सोडले. वाहाते गटार बंद झाले असले तरी लोकवस्तीत विहिरीप्रमाणे खड्डा करून पाणी सोडल्याने हा खड्डा पूर्ण भरला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पती वाढत आहे. साथरोग पसरण्याची भीती आहे. तसेच हा खड्डा लोकवस्तीत असून, लहान मुले या परिसरात खेळत असतात. त्यामुळे मुले या खड्ड्यात पडून अपघात घडण्याचीही भीती आहे. उघड्यावर वाहणारे सांडपाणी बंद करण्याची तसेच खड्डा बुजविण्याची मागणी केलेली असताना विस्तार अधिकारी व प्रशासकांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून या प्रश्नाबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.