सुदृढ मुले हीच आपली संपत्ती : भीमराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:22+5:302021-04-18T04:39:22+5:30
रहिमतपूर : ‘सुदृढ मुले हीच आपली संपत्ती असून, मुलांचे सर्वांगीण पोषण करण्याची नैतिक जबाबदारी पालकांची आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा ...
रहिमतपूर : ‘सुदृढ मुले हीच आपली संपत्ती असून, मुलांचे सर्वांगीण पोषण करण्याची नैतिक जबाबदारी पालकांची आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे ग्रामपंचायत व एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्यातर्फे पोषण आहार पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘लहान मुलांना पौष्टिक आहार देऊन सुदृढ बनविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या पालनपोषणाकडे दुर्लक्ष न करता परिपूर्ण आहार देऊन त्यांचे पोषण करण्याकडे लक्ष द्यावे. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या वतीने पोषण आहारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,’ असे आश्वासन दिले. बीट पर्यवेक्षिका प्रज्ञा बेंद्रे व सरपंच सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पौष्टिक आहार व औषधांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शंकरराव गायकवाड, सदस्या उषा गायकवाड, अनिता पिसे, मनीषा गुजले, सुनंदा गायकवाड, मालन पवार, स्नेहल शिंदे, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते. शोभा शिवदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
१७रहिमतपूर
फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे भीमराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पौष्टिक आहार व औषधांचे वाटप करण्यात आले.
(छाया : जयदीप जाधव)