तब्बल पंचावन्न टन कचरा उचलला
By admin | Published: November 16, 2014 11:28 PM2014-11-16T23:28:42+5:302014-11-16T23:51:40+5:30
महास्वच्छता अभियान : चार तासांत हजारो हात फिरले सातारा शहराच्या रस्त्यांवर
सातारा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे २ हजार सदस्यांचे एकवटलेले चार हजार हात अन् त्यांना मिळालेली नगरपालिकेची भक्कम साथ या एकीतून सातारा शहरातून ४ तासांत तब्बल ५५ टन कचरा उचलण्यात आला. एकाच वेळी सातारा शहराच्या रस्त्यांवर हजारो झाडू फिरले अन् शहराचे रूपडे पालटून गेले.
सातारा शहरात रविवारी सकाळी आठ वाजता महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे २ हजार सदस्यांनी संपूर्ण सातारा शहरात स्वच्छता मोहीम राबविली. मोती चौकातून स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला. यामध्ये सुमारे १५० ट्रक कचरा गोळा करण्यात आला. नगरपालिकेने तो कचरा उचलून कचरा डपोत टाकला.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून राज्यपालांनी त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या व सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आली. अभियानासाठी संपूर्ण जिल्ह्यातून श्री सदस्य जेवणाचे डबे, झाडू, घमेली, वाहने, मास्क, हातमोजे, पाण्याच्या बाटल्या घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सातारा शहरात रविवारी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ठिकठिकाणी महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली.