मराठ्यांच्या वेदना ऐकताना हेलावला अवघा जनसागर !
By admin | Published: October 3, 2016 11:43 PM2016-10-03T23:43:15+5:302016-10-04T01:05:15+5:30
शेतकऱ्यांची वेदना मांडली : अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले
सातारा : ‘आमच्याकडे गुणवत्ता असूनही हव्या त्या शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश मिळत नाही. उसनवारी करून शिकलो तरी नोकरी मिळत नाही. शेतमालाला भाव नाही, मग आम्ही करायचं काय? सरकारने जी अक्कल पाजळवायची ती पाजळावी, कायद्यात बदल करावा; अन्यथा सरकारची पळता भुई थोडी करू,’ असे आवेशपूर्ण भाषण महामोर्चाला संबोधित करताना तरुणींनी केले. या आवेशपूर्ण शब्दज्वाळांनी वातावरण स्तब्ध झाले होते.
ही तरुणी म्हणाली, ‘शेती ही प्रतिष्ठेची बाब होती. पूर्वी शेती वरिष्ठ मानली जात होती. नोकरी मध्यम समजली जात होती. मात्र, आता शेतीमालाची स्वस्ताई जगू देत नाही. शेती परवडत नाही म्हणून शिकायचं म्हटलो तर गुणवत्ता असूनही महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नाही. अॅट्रॉसिटीचा वापर दुकानदारी म्हणून केला जात आहे. पहिल्यांदा शेतीव्यवस्था मजबूत करा. मराठा आता जागा झाला आहे, कोपर्डीच्या निमित्ताने तो ज्वालाग्रही म्हणून बाहेर आला आहे. भगव्या झेंड्याचा आक्रोश होतोय. मराठाविना राष्ट्रगाडा चालणार नाही. आमच्या एका हातात तलवार तर एका हातात नांगर आहे. या तलवारी आम्ही शमीच्या झाडावर ठेवल्या आहे, त्या उचलायला आम्हाला भाग पाडू नका. शेतकरी होरपळून निघतो आहे. बी-बियाणे, खते नाहीत, निसर्गाची साथ नाही, बाजारभाव मिळत नाही, शेतकरी पाण्यावाचून तडफडतोय आणि आरक्षण पोराला शिकू देत नाही. आत्महत्या करणारा ९० टक्के शेतकरी मराठा आहे. आम्हाला आमच्या वाट्याची भाकरी हवी आहे. मराठ्यांचा हा आक्रोश आता दिल्लीलाही हलविल्याशिवाय राहणार नाही,’ असा एल्गार मराठा क्रांती महामोर्चाच्या अग्रभागी असलेल्या तरुणींनी व्यक्त केला. शेतकऱ्यांची होरपळ, आरक्षणाअभावी पिछेहाट, सरकारची अनास्था आदी प्रश्नांची आक्रमक, मुद्देसूद आणि काळजाला हात घालणाऱ्या तरुणींच्या भाषणांनी उपस्थितीतांच्या अंगावर काटा उभा राहिला.
दुसरी एक तरुणी म्हणाली, ‘मराठ्यांचा महामोर्चा निघणार, हे कळताच अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आला. मात्र, हा महामोर्चा अथवा आमची भूमिका ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, तर आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आहे, हे आम्ही पटवून दिले, तेव्हा संपूर्ण समाजातून पाठिंबा मिळाला.’ (प्रतिनिधी)
निवेदन हेच शिष्टमंडळ
आम्ही दिलेले निवेदन हेच शिष्टमंडळ आहे, आम्ही आमच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला दिले आहे. संपूर्ण देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. हे लक्षात घ्या आणि चर्चा थांबवून निर्णय घ्या, असेही एका तरुणीने स्पष्ट केले.